पुणे : कारागृहात असलेल्या मित्राला जामीनावर बाहेर काढण्यासाठी पुणे शहर, तसेच साताऱ्यात घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या चोरट्यांना गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्यांकडून सोन्याचे दागिने, दुचाकी, कटावणी असा १२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अंकुश राम गोणते (वय ३२), हर्षद गुलाब पवार (वय ३०, दोघे रा. सुतारदरा, कोथरुड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
गोणते आणि पवार हे सुतारदरा परिसरात राहायला आहेत. गोणतेला खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. पवारला घरफोडीच्या गुन्ह्यात अटक झाली होती. कारागृहात असताना दोघांची मैत्री झाली. गोणतेला न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर तो कारागृहातून बाहेर पडला. पवारला जामीन न मिळाल्याने तो कारागृहात होता. पवारला जामीन मिळवून देण्यासाठी गोणते प्रयत्न करत होता. त्यासाठी त्याला पैशांची आवश्यकता होती.
हेही वाचा : “अश्विनी जगताप यांना गैरसमज झाला होता, त्यांना…”, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांचे स्पष्टीकरण
गोणतेने घरफोडीचे गुन्हे करुन पवारला जामीन मिळवून देण्यासाठी पैसे उभे केले. कारागृहातून पवार बाहेर पडला. त्यानंतर गोणते अणि पवारने पुणे, तसेच सातारा शहर परिसरात घरफोडीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. सहकारनगर भागात दोघांनी नुकतीच घरफोडी केली होती. गुन्हे शाखेच्या युनिट दोनमधील पोलीस कर्मचारी गजानन सोनुने आणि अमोल सरडे यांना याबाबतची माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून सोने, चांदीचे दागिने, दुचाकी, कटावणी, दागिन्यांचे वजन करण्यासाठी इलेक्ट्राॅनिक यंत्र असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
हेही वाचा : बांगलादेशातील बॉम्बस्फोट प्रकरणामधील आरोपीला पुण्यात अटक; दलालामार्फत पारपत्र मिळविल्याचे उघड
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार बिडवई, सहायक निरीक्षक वैशाली भोसले, विसाल मोहिते, उपनिरीक्षक नितीन कांबळे, गजानन सोनुने, अमोल सरडे, पुष्पेंद्र चव्हाण, संजय जाधव, नागनाथ राख, गणेश थोरात, साधना ताम्हाणे आदींनी ही कारवाई केली.