पुणे : बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांना अंनिसचे सदस्य मिलिंद देशमुख यांनी पुन्हा खुले आव्हान दिले आहे. बंद पाकिटातील नोटांचा नंबर ओळखल्यास धीरेंद्र शास्त्री यांना आम्ही २१ लाख देऊ आणि अंधश्रद्धा निर्मूलन संस्था कायमची बंद करू असे खुले चॅलेंज त्यांनी दिले आहे. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज आणि अंनिस यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. आता थेट अंनिसने खुले चॅलेंज दिले आहे.
बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांचा पुण्यात नुकताच सत्संग आणि दिव्य दरबारचा कार्यक्रम पार पडला. लाखो पुणेकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. नेत्यांसह उच्च पदस्थ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. शास्त्री यांच्या कार्यक्रमाला अंनिससह इतर संस्थांनी विरोध केला होता. धीरेंद्र शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन अंनिसच्या आव्हानाला चॅलेंज करत ‘अंनिसने दरबारात येऊन दूध का? दूध आणि पाणी का? पाणी करावं’, असं म्हटलं होतं.
हेही वाचा : राज्यातील शाळांमध्ये आता ‘वाचन चळवळ’, शालेय शिक्षण विभागाची मान्यता
यावर आता अंनिस चे सदस्य मिलिंद देशमुख यांनी म्हटलं आहे, धिरेंद्र शास्त्री यांनीच समोर यावं. आम्ही दरबारात येणार नाहीत. सर्वांसमोर सोक्षमोक्ष लागेल. आम्ही त्यांची एक परीक्षा घेऊ त्यात ते पास होतील की नाही बघुयात. बंद पाकिटातील आम्ही सांगितलेल्या नोटांचा नंबर ओळखल्यास आम्ही त्यांना २१ लाख रोख बक्षीस म्हणून देऊ आणि अंधश्रद्धा निर्मूलन संस्था कायमची बंद करू, असे आम्ही स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, असे खुले चॅलेंज धीरेंद्र शास्त्री महाराज यांना दिले आहे. पण, हे आव्हान धीरेंद्र शास्त्री महाराज स्वीकारतील असे वाटत नाहीत. कारण ते केवळ दरबारात असे बोलू शकतात, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. अंनिसचं हे खुलं आव्हान धिरेंद्र शास्त्री महाराज स्वीकारणार का? हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.