पुणे : ‘माझ्यातील खिलाडू वृत्तीला मुंबईतील गणेश मंडळात चालना मिळाल्याने खेळाडू म्हणून जडणघडण झाली. पदक मंचापर्यंत पोहोचणारा एकच खेळाडू असतो. त्याच्या यशप्राप्तीसाठी मेहनत, जिद्द या बरोबरीनेच सुहृदांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद महत्त्वाचे असतात,’ अशी भावना जागतिक कीर्तीच्या नेमबाज अंजली भागवत यांनी रविवारी व्यक्त केल्या.
‘समाज एकत्र राहण्यासाठी आणि हिंदुत्व टिकविण्यासाठी केवळ सामाजिक कामच नाही तर, वैचारिक देवाणघेवाणीचे कार्य करणाऱ्या गणेश मंडळांमार्फत घडावे’, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
साईनाथ मंडळ ट्रस्टतर्फे भारतीय महिला हॉकी संघाच्या माजी कर्णधार रेखा भिडे यांच्या हस्ते अंजली भागवत यांचा साई पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्याप्रसंगी भागवत बोलत होत्या. राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, आमदार हेमंत रासने, श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने आणि साईनाथ मंडळ ट्रस्टचे अध्यक्ष पीयूष शहा या वेळी उपस्थित होते.
‘सिडनी ऑलिम्पिकमध्ये निवड होण्याकरिता बरीच प्रतीक्षा करावी लागली. त्यावेळी माझ्या वडिलांना शिर्डीला जाऊन साईंकडे प्रार्थना केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी माझी निवड झाल्याचे समजले,’ अशी आठवण भागवत यांनी सांगितली.
डॉ. मोरे म्हणाले, ‘पुण्यातील गणेश मंडळे केवळ गणेशोत्सवातच नव्हे, तर आदर्शवत काम करीत असतात. या पुरस्काराच्या माध्यमातून भागवत यांना साईंच्या कृपेची सावली लाभली आहे.’
भिडे म्हणाल्या, ‘आयुष्यात पुढे जाण्यासाठी श्रद्धा आणि सबुरी असणे अत्यंत आवश्यक आहे. अंजली भागवत या अतिशय निष्ठावान खेळाडू असून, युवा पिढीला मार्गदर्शन करीत आहेत, याचे कौतुक आहे.’
रासने, शहा यांनी मनोगत व्यक्त केले. जतीन पांडे यांनी सूत्रसंचालन केले.