पुणे : समाजमाध्यमात बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. आव्हाड यांनी हजारे यांचे छायाचित्र समाजमाध्यमात प्रसारित केले. ‘या माणसाने देशाचे वाटोळे केले. टोपी घातली म्हणजे कोणी गांधी होत नाही,’ असा मजकूर आव्हाड यांनी समाजमाध्यमात प्रसारित केला होता. हजारे यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी त्यांचे पुण्यातील कायदेशीर सल्लागार ॲड. मिलिंद पवार यांच्यामार्फत आव्हाड यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सध्या राजकारणातील घडामोडींमुळे वातावरण गढूळ झाले आहे. हजारे यांचा काही संबंध नसताना त्यांच्याविषयक बदनामीकारक मजकूर आव्हाड यांनी प्रसारित केला आहे. आव्हाड यांनी जाणीवपूर्वक बदनामी केली. त्यामुळे त्यांना कायदेशीर नोटीस बजाविण्यात आली आहे. संबंधित नोटीशीची प्रत माहितीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनाही पाठविण्यात आली आहे, असे ॲड. पवार यांनी सांगितले.

हेही वाचा : VIDEO: गोष्ट पुण्याची भाग – ‘गदिमां’च्या सुरेल आठवणी जपणारं त्यांचं निवासस्थान पंचवटी!

आव्हाड जबाबदार राजकीय नेते आहेत. त्यांनी मजकूर प्रसारित करुन हजारे यांची बदनामी केली आहे. हजारे यांच्या नावाचा वापर करुन आव्हाड राजकीय प्रसिद्धी मिळवत आहेत. आव्हाड यांच्याविरुद्ध १० ते १५ फौजदारी खटले आहेत. आव्हाड बदनामीकारक मजकूर प्रसारित करुन समाजात वाद निर्माण करतात. बेजबाबदार राजकीय व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्याची गरज वाटल्याने आव्हाड यांना नोटीस पाठविण्यात आली आहे, असे हजारे यांच्या वतीने ॲड. पवार यांनी दिलेल्या नोटिशीत नमूद केले आहे.

हेही वाचा : काँग्रेस पक्षात गटबाजी नाही, तर रविंद्र धंगेकर आजारी असल्याने बैठकीला आले नाही : नाना पटोले

या पूर्वी काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी हजारे यांच्याविषयी बदनामीकारक वक्तव्य केल्याने त्यांना नोटीस बजाविण्यात आली होती. तिवारी आणि मलिक यांनी माफी मागितली होती. आव्हाड यांनी माफी न मागितल्यास त्यांच्याविरुद्ध मानहानी, बदनामी केल्याप्रकरणी फौजदारी आणि दिवाणी स्वरुपाचे दावे दाखल करण्यात येतील, असे ॲड. पवार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune anna hazare sent legal notice to ncp leader jitendra awhad for defamation on social media post pune print news rbk 25 css
Show comments