पुणे : देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या सराइताला खंढणी विरोधी पथकाने शंकरशेठ रस्ता परिसरात पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, दोन काडतुसे जप्त करण्यात आली. अझहर रमजान सय्यद (वय २३, रा. म्हसोबा मंदिर, भवानी पेठ ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर बेकायदा शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.
सय्यद शंकरशेठ रस्त्यावरील मीरा हाॅस्पिटलजवळील गल्लीत थांबला होता. त्याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती खंडणी विरोधी पथकातील पोलीस हवालदार सुरेंद्र जगदाळे आणि पवन भोसले यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून सय्यदला पकडले. त्याच्याकडून पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली.
हेही वाचा : पुणे : कामशेत परिसरात ५७ लाखांचा गांजा जप्त, चौघे अटकेत
पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक निरीक्षक प्रशांत संदे, सुनील पवार, सुरेंद्र जगदाळे, पवन भोसले, संग्राम शिनगारे, सैदोबा भोजराव, दिलीप गोरे, अमोल राऊत यांनी ही कारवाई केली.