पुणे : देशभरात अभिमत विद्यापीठ स्थापन करण्यासाठी, अभिमत विद्यापीठाचे अन्यत्र केंद्र सुरू करण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन करण्यात आली आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अभिमत विद्यापीठासाठी स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले असून, या संकेतस्थळामुळे संपूर्ण प्रक्रिया सुलभ आणि वेगवान होणार आहे. देशभरात वेगवेगळ्या प्रकारची विद्यापीठे आहेत. त्यात केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, खासगी विद्यापीठांप्रमाणेच अभिमत विद्यापीठांचाही समावेश आहे. उच्च शिक्षण संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा विद्यापीठ अनुदान आयोगाकडून दिला जातो. अभिमत विद्यापीठांना शैक्षणिक स्वायत्तता असते.
अभिमत विद्यापीठे विविध विद्याशाखांमध्ये स्वतःचे अभ्यासक्रम तयार करू शकतात, आतापर्यंत अभिमत विद्यापीठ किंवा विद्यापीठाचे केंद्र स्थापन करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने अर्ज करून मान्यता प्रक्रिया पूर्ण करावी लागत होती. मात्र, तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ही प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबवणे शक्य असल्याने स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करून ते कार्यान्वित करण्यात आले आहे. यूजीसीच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या यादीनुसार सध्या देशभरात १२५ अभिमत विद्यापीठे आहेत.
हेही वाचा : ‘आरटीओ’तील खोळंबा! कर्मचारी संपावर, अधिकारी कामावर अन् नागरिकांची गैरसोय
अभिमत विद्यापीठाच्या संकेतस्थळाबाबत यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी म्हणाले, की पहिल्यांदाच अभिमत विद्यापीठांसाठी स्वतंत्र संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. अभिमत विद्यापीठ सुरू करण्यासाठी इच्छुक संस्था किंवा अन्यत्र केंद्र सुरू करण्यासाठी अभिमत विद्यापीठे संकेतस्थळाद्वारे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करू शकतात. यूजीसीने अभिमत विद्यापीठांसाठी समिती नियुक्त केली आहे. संकेतस्थळाद्वारे आलेल्या अर्जांची समितीद्वारे छाननी करून आवश्यकतेनुसार विद्यापीठाच्या ठिकाणी भेट देऊन यूजीसीला शिफारस केली जाईल. त्यानंतर मान्यता प्रक्रिया पूर्ण होईल. संकेतस्थळामुळे ही प्रक्रिया वेगवान, सुलभ आणि पारदर्शी पद्धतीने होण्यास मदत होऊ शकणार आहे.
हेही वाचा : ‘या’ तारखेपर्यंत पुणे लोकसभा पोटनिवडणूक जाहीर झाल्यास ३० हजार पुणेकर मतदानाला मुकणार…जाणून घ्या कारण
२० पेक्षा जास्त अर्ज दाखल
अभिमत विद्यापीठांच्या ऑनलाइन प्रक्रियेत जनरल, डिस्टिंक्ट, डिस्टिंक्ट (न्यू) आणि ऑफ कॅम्पस अशा चार श्रेणींचा समावेश आहे. या श्रेणीअंतर्गत आतापर्यंत २०पेक्षा जास्त अर्ज दाखल झाल्याची माहिती डॉ. जोशी यांनी दिली.