पुणे : अपघातानंतर जप्त केलेले वाहने परत करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच मागणाऱ्या सहायक पोलीस फौजदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडले. पिंपरी-चिंचवडमधील चिखली पोलीस ठाण्यात पहाटे एसीबीच्या पथकाने ही कारवाई केली. नरेंद्र लक्ष्मण राजे (वय ५४) असे लाचखोर सहायक फौजदाराचे नाव आहे. राजे पिंपरी चिंचवड शहरातील चिखली पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहे. याबाबत एका तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तरुणाच्या गाडीचा अपघात झाला होता. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. अपघातानंतर जप्त केलेले वाहन तरुणाला परत देण्यासाठी राजे याने दीड लाख रुपयांची मागणी केली होती. तडजोडीत तरुणाने एक लाख रुपये देण्याचे मान्य केले.
हेही वाचा : येत्या काळात नोकऱ्यांचे स्वरूप बदलणार… एआयसीटीईचे उपाध्यक्ष डॉ. अभय जेरे यांचे मत
तरुणाने राजे याला ७० हजार रुपये दिले होते. लाचेची उर्वरित रक्कम देण्यासाठी राजेने तगादा लावला होता. राजेच्या त्रासामुळे अखेर तरुणाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीची पडताळणी करुन पहाटे पाचच्या सुमारास चिखली पोलीस ठाण्यात सापळा लावण्यात आला. तरुणाकडून २० हजार रुपयांची लाच घेताना राजे याला पकडण्यात आले. पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रसाद लोणारे, पोलीस शिपाई भूषण ठाकूर, सुराडकर, हवालदार चव्हाण यांनी ही कारवाई केली.