पुणे : जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघापैकी सात मतदारसंघांत ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर जिल्ह्यातील सात मतदारसंघांत ‘राष्ट्रवादी’ विरुद्ध ‘राष्ट्रवादी’ अशा लढती रंगणार आहेत. जिल्ह्याच्या राजकारणात कोणत्या पवारांचे एकहाती वर्चस्व राहणार, या दृष्टीने या लढतींकडे पाहिले जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार भाजप-शिवसेना शिंदे पक्षाच्या सरकारमध्ये सामील झाले. त्या वेळी पुणे, पिंपरी-चिंचवडसह ग्रामीण भागातील अनेक आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांना जाहीर समर्थन दिले. मात्र, लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना विशेष प्रभाव दाखविता आला नाही. त्याउलट राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाला लोकसभा निवडणुकीत चांगले यश मिळाले. त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्यासाठी अनेकांची चढाओढ सुरू झाली. अजित पवार यांच्याकडील काही आमदारही शरद पवार यांच्या संपर्कात होते. मात्र, त्यांना पक्षात न घेता शरद पवार यांनी नवे उमेदवार दिले आहेत.

हेही वाचा : ‘पवार’ विरुद्ध ‘पवार’ : अंक दुसरा! अजित पवार आणि युगेंद्र पवार यांचे बारामतीतून उमेदवारी अर्ज दाखल

u

अजित पवार यांना स्वत: बारामतीमधून त्यांचे पुतणे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचे कडवे आव्हान आहे. शिरूरमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाने शिवसेना (ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख माऊली कटके यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली. कटके यांचे विद्यमान आमदार अशोक पवार यांना आव्हान असणार आहे. इंदापूरमध्ये माजी मंत्री, भाजपचे हर्षवर्धन पाटील यांना पक्षात घेऊन शरद पवार यांनी महायुतीला धक्का दिला. तेथे इंदापूरमध्ये अजित पवार समर्थक आमदार दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील अशी लढत होणार आहे. आंबेगाव तालुक्यात अजित पवार यांचे समर्थक दिलीप वळसे पाटील यांना, त्यांचे एके काळचे सहकारी देवदत्त निकम राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाकडून आव्हान देणार आहेत.

हेही वाचा : “माणसं उभा करणार्‍याला विकास म्हणायचं की इमारती उभा करणार्‍याला विकास म्हणायचं?” खासदार अमोल कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

जुन्नर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार अतुल बेनके यांच्याविरोधात विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक सत्यशील शेरकर आहेत. सत्यशील शेरकर काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र, त्यांना पक्षात घेऊन शरद पवार यांनी उमेदवारी जाहीर केली. शहरातील हडपसर मतदारसंघात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे आमदार चेतन तुपे विरोधात राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप असा सामाना रंगणार आहे. तर, वडगाव शेरी मतदारसंघात अजित पवार समर्थक आमदार सुनील टिंगरे यांच्यापुढे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे माजी आमदार बापूसाहेब पठारे यांचे आव्हान असेल. बापूसाहेब पठारे यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली असून, शरद पवार यांनी त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या सात ठिकाणी पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पुणे जिल्ह्यात कोणत्या राष्ट्रवादीचे वर्चस्व राहील, हे या निवडणुका ठरविणार आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune at 7 assembly constituencies ajit pawar ncp vs sharad pawar ncp pune print news apk 13 css