पुणे : अनैतिक संबंध ठेवण्यास नकार दिल्याने महिलेशी अश्लील वर्तन करुन तिला बंदुकीचा धाक दाखविण्यात आल्याची घटना बाणेर परिसरात घडली. याप्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चंद्रकांत अनंत गाडे असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. गाडेविरुद्ध विनयभंग, तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा : दोन तासांचे काम अवघ्या ४० मिनिटांत, पुणे- मुंबई द्रुतगतीमार्गावरील वाहतूक वेळेआधीच सुरू
तक्रारदार महिला आणि गाडे ओळखीचे आहेत. महिला बाणेर रस्ता परिसरातील एका उपाहारगृहाजवळून निघाली होती. त्यावेळी गाडेने तिला अडवले. तिच्याशी अश्लील वर्तन करुन अनैतिक संबंध ठेवण्यास सांगितले. महिलेने त्याला नकार दिला. तेव्हा गाडेने मोटारीत ठेवलेली बंदुक दाखविली. तुझ्यासह कुटुंबीयांना जीवे मारु अशी धमकी गाडेने दिल्याचे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करत आहेत.