पुणे : हडपसर भागात टोळक्याकडून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. टोळक्याने संकेत विहार सोसायटी परिसरात कोयते उगारून वाहनांची तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चार ते पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मारुती तात्यासाहेब काळोखे (वय ३१, रा. दिव्याश्रय सोसायटी, संकेत विहार, फुरसुंगी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

संकेत विहार सोसायटी परिसरात गुरुवारी मध्यरात्री टोळके आले. शिवीगाळ करून त्यांनी नागरिकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. टोळक्याने कोयते उगारून वाहनांच्या काचा फोडण्यास सुरुवात केली. काळोखे यांनी हा प्रकार पाहिला. त्यांनी तोडफोड करणाऱ्या आरोपींना जाब विचारला. तेव्हा आरोपींनी काळोखे यांच्यावर कोयता उगारून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

हेही वाचा : बीबीए, बीसीए अभ्यासक्रमांच्या शुल्काचे काय होणार?

गेल्या काही महिन्यांपासून हडपसर भागात टोळक्याकडून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहे. महिनाभरापूर्वी टोळक्याने या भागातील दुकानदारांना धमकावून तोडफोड केली होती. तोडफोडीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत.