पुणे : भांडणे सोडविणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकावर सराइतांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना हडपसर भागात घडली. सराइतांनी सहायक निरीक्षकाला कोयता फेकून मारल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेत सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निहालसिंग मन्नूसिंग टाक (वय १८, रा. तुळजाभवानी वसाहत, हडपसर), राहूलसिंग उर्फ राहुल्या रवींद्रसिंग भोंड (वय १९, रा. हडपसर) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. आरोपींनी केलेल्या हल्ल्यात सहायक निरीक्षक रत्नदीप गायकवाड जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती परिमंडळ पाचचे पोलीस उपायु्क्त आर. राजा यांनी दिली. हडपसर भागातील ससाणेनगर परिसरात रविवारी दुपारी चारच्या सुमारास दोन दुचाकीस्वारांमध्ये वाद सुरू होते. त्यावेळी एका दुचाकीस्वाराच्या बाजूने आरोपी निहालसिंग आणि राहुलसिंग भांडणे करत हाेते. आरोपींच्या हातात कोयता होता. त्यावेळी तेथून निघालेले सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी आरोपींना पाहिले. गायकवाड यांनी तेथे धाव घेतली. भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आरोपी निहालसिंग टाक याच्या हातातील कोयता काढून घेण्यााचा प्रयत्न गायकवाड यांनी केला.

हेही वाचा : मुंबई-पुणे रस्त्यावर भरधाव एसटी बसची मोटारीला धडक, भूमी अभिलेख विभागातील अधिकारी महिलेचा मृत्यू

झटापटीत टाकने कोयता फेकून मारल्याने गायकवाड यांच्या कपाळाला गंभीर दुखापत झाली. आरोपी टाक आणि साथीदार भोंड पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजा यांनी घटनास्थळी भेट दिली. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. आरोपी भोंड आणि टाक यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, घरफोडी, चोरी, दंगा करणे असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा : पुणे: दहीहंडीनिमित्त मध्यभागातील वाहतुकीत बदल

पोलीसच असुरक्षित

शहरात किरकोळ वादातून पोलिसांवर हल्ले होण्याच्या घटना वाढीस लागली आहेत. हडपसर भागाातील हांडेवाडी भागात वाहतूक नियमन करणाऱ्या वाहतूक पोलिसाला मोटारचालकाने शिवीगाळ करुन पोटात लाथ मारल्याची घटना घडली होती. वाहतूक नियमन करताना होणाऱ्या वादातून पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune at hadapsar koyta attack on assistant police inspector pune print news rbk 25 css