पुणे : मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे आणि पश्चिम महाराष्ट्रातील राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची पहिली ओबीसी एल्गार सभा ही पुणे जिल्ह्यात इंदापूर येथे झाली. जरांगे यांनी घेतलेल्या सभेच्या मैदानावरच भुजबळ यांची सभा झाली. त्यातच ओबीसी सभा झाल्यानंतर आमदार गोपिचंद पडळकर यांच्या दिशेने चप्पल फेकण्याची घटना घडली होती. त्यामुळे इंदापुरातील वातावरण ढवळून निघाले आहे. मराठा, ओबीसींनंतर आता व्यापाऱ्यांनी इंदापुरात एल्गार करत मोर्चा काढला आणि विविध मागण्या तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाकडे केल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांत सातत्याने घडणाऱ्या घडामोडींमुळे पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका चांगलाच चर्चेत आला आहे.
विविध कारणांमुळे इंदापूर येथे बंद पुकारला जातो. परिणामी व्यापारी, व्यावसायिकांचे नुकसान होते. ही गळचेपी थांबविण्यासाठी यापुढे इंदापूर बंद पुकारू नये, अशी स्पष्ट मागणी इंदापूर शहर व्यापारी असोसिएशनकडून नुकतीच करण्यात आली. त्याकरिता व्यापाऱ्यांनी मोर्चा काढून लेखी निवेदन तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाला दिले आहे. आगामी काळात इंदापूर शहर व्यापारी संघाच्या वतीने व्यवसाय, उद्योगांना नुकसान पोहोचविणाऱ्या बंदमध्ये आम्ही सहभागी होणार नाही, आमची दुकाने, व्यवसाय बंद ठेवणार नाही, असा निर्णय एकमुखाने घेण्यात आला आहे.
हेही वाचा : पुणे : माथाडी कायदा बचावासाठी मार्केटयार्ड बंद; शेतकऱ्यांचे नुकसान
एखादी घटना घडल्यास विविध संघटना, राजकीय पक्षांकडून बंद पुकारण्यात येतो. त्यामुळे दुकाने, पथारीवाले, रस्त्याच्या कडेने बसणारे छोटे व्यावसायिक यांना बंदमध्ये सहभागी व्हावे लागते. सातत्याने बंद होत असल्याने नुकसान होत आहे. व्यवसायिक आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचे यामुळे हाल आणि नुकसान होते. करोना काळात सर्व व्यवहार ठप्प होते, त्यामुळे आता बंद नको, अशी मागणी करण्यात आली आहे.