पुणे : पुणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत कसबा पेठ विधानसभा मतदार संघात निवडणूक कामासाठी नियुक्त स्थिर सर्वेक्षण पथकामार्फत सोमवारी दुपारी ३ लाख ८० हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी ही माहिती दिली. लोकसभा निवडणुकीमुळे राजकारण तापले आहे. पुणे लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे मुरलीधर मोहोळ, काँग्रेसतर्फे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर, वंचित बहुजन आघाडीतर्फे वसंत मोरे, एमआयएमतर्फे अनिस सुंडके हे प्रमुख उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
हेही वाचा : पुण्यात ओला, उबर सुरू राहणार? जाणून घ्या अंतिम निर्णय कधी होणार…
निवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू असल्याने प्रशासनाकडून आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातील फरासखाना पोलीस स्टेशनअंतर्गत शनिवारवाडा प्रवेशद्वारारासमोर सोमवारी दुपारी बारा वाजता एका इसमाकडून ३ लाख ८० हजार ५०० रुपये रक्कम जप्त करण्यात आली. या रकमेबाबत संबंधित व्यक्तीने योग्य स्पष्टीकरण न दिल्याने ती रक्कम जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.