पुणे : लोणावळ्यात लोकलच्या फेऱ्या पूर्ववत कराव्यात तसेच एक्सप्रेस गाड्यांसाठी लोणावळा रेल्वे स्थानकात थांबा करावा या प्रमुख मागणीसाठी आज सकाळी रेल्वे रोको आंदोलन करण्यात आले. लोणावळा रेल्वे स्थानकात पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली डेक्कन क्वीन २० मिनिटे आंदोलकांनी रोखली. आंदोलक रेल्वे रूळावर उतरले होते. डेक्कन क्वीनच्या समोरून आंदोलक बाजूला होत नसल्याने रेल्वे पोलीस आणि लोणावळा पोलिसांनी आंदोलकांना रेल्वे रुळावरून बाजूला केलं. या दरम्यान पोलीस आणि आंदोलक समोरासमोर आले होते.
हेही वाचा : डॉ. भा. र. साबडे यांचे निधन
करोना काळात पुणे ते लोणावळा तसेच लोणावळा ते पुणे या लोह मार्गावर लोकल फेऱ्या योग्य रीतीने सुरू होत्या. परंतु, करोना काळानंतर सकाळी दहा ते दुपारी तीनच्या दरम्यान पुण्याच्या दिशेने एकही लोकल नसल्याने शालेय विद्यार्थी, व्यापारी, पर्यटक यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. तासनतास लोणावळा रेल्वे स्थानकात बसावे लागत असल्याने अखेर सर्वपक्षीय आणि लोणावळा ग्रामस्थ, मावळ ग्रामस्थ यांनी आज सकाळी रेल रोको आंदोलन केलं. पुण्याहून मुंबईच्या दिशेने निघालेली डेक्कन क्वीन आंदोलकांनी रेल्वे रुळावर उतरून २० मिनिटं रोखली. आंदोलक पोलिसांचं ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. पोलिसांना बळजबरीने आंदोलकांना बाजूला करावं लागलं. रेल्वे प्रशासनाने याची दखल न घेतल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.