पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात घडली. अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला. याप्रकरणी मोटारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
सुधांशु राज (वय २२, रा. युनाईट पीजी हाॅस्टेल मॅजेस्टिक सिटी, वाघोली) असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी वैभव रणधीर कुमार (वय २२, रा. युनाईट पीजी होस्टेल, मॅजेस्टिक सिटी, वाघोली, मूळ रा. पटणा, बिहार) याने लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी मध्यरात्री रात्री सव्वा दोनच्या सुमारास नगर गाडे वस्ती भागात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैभव कुमार आणि सुधांशु राज हे वाघोली भागातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतात. शनिवारी रात्री ते विमाननगर भागात गेले होते. रात्री उशीरा चित्रपट पाहून ते दुचाकीवरुन वाघोलीकडे निघाले होते. जेवण करून ते घरी जाणार होते. त्यांच्याबरोबर मित्र-मैत्रिणी होते.
हेही वाचा : केरळी वाद्य ‘चेंदा मेलम’च्या वादनाने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला अभिवादन
गाडे वस्ती भागातील एका फर्निचरच्या दुकानासमोर दुचाकीस्वार वैभव वळण घेत होता. त्यावेळी भरधाव मोटारीने दुचाकीला धडक दिली. दुचाकीस्वार वैभव फेकला गेल्याने तो बचावला. सहप्रवासी सुधांशू गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी झालेल्या सुधांशूचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. दुचाकीस्वार वैभव याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक पोलीस निरीक्षक घाेरपडे तपास करत आहेत.