पुणे : अल्पवयीन कर्णबधिर मुलीवर तिच्याच मित्र तसेच नातेवाईक आणि एका ओळखीतील तरुणाने वारंवार बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. कर्णबधिर शाळेतील शिक्षिकेने विचारणा केल्यानंतर त्यांच्यासमोर मुलीने ही कैफियत मांडली आणि हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात सागर रजाने (वय ३०, रा. उंड्री, कोंढवा), राहुल पाटील (वय २३) यांच्यासह तिच्या एका नात्यातील अल्पवयीन मुलावर बलात्कार, पॉक्सो, विनयभंग यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी एका कर्णबधिर शाळेच्या शिक्षिकेने तक्रार दिली आहे. हा प्रकार २०१८ पासून २०२३ पर्यंत सुरू होता.
हेही वाचा : पत्रकार नसशील तर बाजूला हो, कशाला प्रश्न विचारतो… चंद्रकांत पाटीलांचा तरुणाला प्रतिप्रश्न
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी १७ वर्षांची आहे. गेल्या पाच वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. ती कर्णबधिर आहे. राहुल पाटील हा तिचा मित्र आहे. तर, अल्पवयीन मुलगा तिच्या जवळच्या नात्यातील आहे. सागरने तिच्या घरी येऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तिला मारहाण केली आणि कोणाला काही सांगितले तर मारून टाकण्याची धमकी दिली. तसेच, राहुलने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवत तिच्यावर बलात्कार केला. तर तिच्या नात्यातील १४ वर्षीय मुलाने घरात कोणी नसल्याचा फायदा घेत जबरदस्तीने अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. ही पीडित मुलगी आणि तिचा मित्र बोलत असताना तिला शिक्षकांनी पाहिले. तिच्याकडे विचारणा केली असता हा सर्व प्रकार समोर आला आहे.