पुणे : बंदी घातलेल्या गुटख्याचा साठा करून छुप्या पद्धतीने विक्री करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. रास्ता पेठ परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपींकडून १० लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मुदसर इलियास बागवान (वय ४०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) अन्वर शरफुद्दिन शेख (वय ३८, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांविरुद्ध समर्थ पोलीस ठाण्यात सिगारेट, अन्य तंबाखूजन्य पदार्थ उत्पादने, अन्न सुरक्षा मानके कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यशासनाने गुटखा वाहतूक, विक्रीवर बंदी घातली आहे. छुप्या पद्धतीने गुटखा विक्री, तसेच वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येत आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक आणि पथक रास्ता पेठेत गस्त घालत होते.
रास्ता पेठेतील एका सोसायटीत दोघांनी गुटखा, पानमसाल्याचा साठा करून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० लाख ८४ हजार ७१६ रुपयांचा गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक निरीक्षक नितीनकुमार नाईक, आझाद पाटील, योगेश मांढरे, चेतन गायकवाड, संदीप जाधव, उदय राक्षे यांनी ही कारवाई केली.
© The Indian Express (P) Ltd