शिरूर : कारेगाव परिसरातील लोकांची फसवणूक करून पलायन केलेल्या सोनारास परराज्यातून अटक करुन ५५ लाख रुपये किंमतीचे ९१ तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. प्रताप परमार उर्फ नरपतसिंह मोहब्बतसिंह रजपूत (वय ४०, मूळ रा. चामुंडेरी, जि. पाली, राजस्थान) असे सोनाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारेगाव येथील महादेव ज्वेलर्स नावाने दुकान चालविणारा प्रताप परमार याने परिसरातील नागरिकांकडून गहाण ठेवण्यासाठी, दुरुस्त करण्यासाठी, मोडण्यासाठी आलेले सोने आणि नवीन सोने खरेदीसाठी आलेले पैसे घेवून फसवणूक केल्याचे १६० नागरिकांचे तक्रारी अर्ज प्राप्त झाले होते. मोबाईल बंद करून या सोनाराने रातोरात त्याच्या कुटुंबासह पलायन केल्याने नागरिक चिंताग्रस्त झाले होते. बहुतांश तक्रारदार नागरीक हे रांजणगाव एमआयडीसीमधील कामगार असल्याने आर्थिक अडचणीमुळे त्याच्याकडे सोने गहाण ठेवत होते. याबाबत मनीषा रामचंद्र नवले (रा. कारेगाव, ता. शिरूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनार प्रताम परमार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
हेही वाचा : सलग सुट्ट्यांमुळे द्रुतगती मार्गावर कोंडी; नाताळानिमित्त लोणावळ्यात पर्यटकांची गर्दी
पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी तपास पथकास आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. तपास पथकाने परमारबाबत गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेत असताना पोलीस उपनिरीक्षक सुहास रोकडे, उमेश कुतवळ यांनी प्रतापचा गुजरातमधील कटोसन (ता. कडी , जि. अहमदाबाद) येथे जाऊन शोध घेतला. एका कपड्याच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या माहितीपत्रकावर प्रताप परमार याचे नाव व नवीन मोबाईल नंबर मिळून आला. त्याच्या आधारे नवीन कपडे खरेदीच्या बहाणा करुन दुकानात गेले असता हे दुकान प्रताप परमार याचेच असल्याची खात्री झाली. आरोपीस तपास पथकाने ताब्यात घेउन अटक केली आहे. प्रताप परमार याने १६० नागरिकांची शंभर तोळे सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा : मनोज जरांगे यांच्या इशारा सभेवर अजित पवार यांची प्रतिक्रिया… म्हणाले, ‘कोणी काय मागणी करावी…’
परमार याने नागरिकांकडून घेतलेले सोन्याचे दागिने हे कारेगाव येथील ओंकारबाबा ग्रामीण निधी लि. या पतसंस्थेत आणि काही दागिने त्याच्या दुकानाचा जुना भागीदार कुमार चंद्रकांत ओव्हळ (रा. शिंदोडी, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्याकडे असल्याचे निष्पन्न झाले. आत्तापर्यंत एकूण ५४ लाख ६० हजार रुपय किंमतीचे ९१ तोळे वजनाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. पोलीस अधीक्षक अंकित गोयल आणि अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या उपस्थितीत हे दागिने नागरिकांना परत करण्यात आले.