पुणे : वेल्ह्यातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा रात्री उशिरापर्यंत सुरु ठेवल्याप्रकरणी बँक व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत रमेश अजिनाथ बेलेकर (वय ३५, रा. नसरापूर, ता. भोर. जि. पुणे) यांनी वेल्हे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी बँक व्यवस्थापक विनायक तेलावडे यांच्याविरुध्द आदेशाचा भंग केल्याप्रकरणी (भादंवि १८८) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रमेश बेलेकर वेल्ह्यात कृषी सहायक आहेत. त्यांची निवडणूक आयोगाकडून वेल्हे तालुक्यात भरारी पथकाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भरारी पथकातील बेलेकर, तुषार तडवी आणि सहकारी सोमवारी पहाटे चारच्या सुमारास गस्त घालत होते. रोहित पवार यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची वेल्हे शाखा रात्री बारानंतर सुरू असल्याची माहिती समाजमाध्यमातून दिली. त्यानंतर भरारी पथक तेथे पोहोचले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : बारामतीतील मतदान संपताच वारज्यामध्ये गोळीबार

भरारी पथकाने तेथे पाहणी केली. तेव्हा बँक व्यवस्थापकांच्या दालनाच्या बाहेर ४० ते ५० जण थांबले होते. त्यानंतर भरारी पथकाने बँक व्यवस्थापक तेलावडे यांच्याशी संपर्क साधला. बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासायचे असल्याचे भरारी पथकाकडून सांगण्यात आले. त्यानंतर बँकेचे विभागीय अधिकारी प्रकाश गायकवाड यांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासण्यास परवानगी दिली. सीसीटीव्ही चित्रीकरणात ४० ते ५० जण बँकेत आढळून आले. बँकेची वेळ संपल्यानंतर मध्यरात्रीनंतर बँक सुरू ठेवली, तसेच आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बंँक व्यवस्थापक तेलावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune at velhe case registered on bank manager of pune district central co op bank open in late night pune print news rbk 25 css