पुणे : मिळकतकर भरण्यासंदर्भात वारंवार नोटिसा बजावूनही कर न भरल्यामुळे जप्त केलेल्या मिळकतींचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात २०० मिळकतींचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावाची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार आहे. मिळकतकर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. सध्या मिळकतकरातून वर्षभरात २ हजार कोटींचे उत्पन्न मिळेल, असा अंदाज आहे.
मिळकतकराची थकबाकी वसुलीलाही महापालिका प्रशासनाकडून प्राधान्य देण्यात आले असून, कोट्यवधी रुपयांची थकबाकी असलेल्या मिळकतींना नोटिसा पाठविणे, दंड आकारणे आणि वारंवार नोटिसा बजावून मिळकतकर न भरणाऱ्या मिळकती सील करणे, अशी कार्यवाही महापालिकेच्या कर आकारणी आणि कर संकलन विभागाकडून केली जात आहे. त्यानुसार आतापर्यंत महापालिकेने १४ हजार मिळकती सील केल्या आहेत. तर ३० हजार व्यावसायिक मिळकतींचा कर थकीत आहे. त्यामुळे आता उत्पन्न वाढीसाठी सील केलेल्या मिळकतींचा लिलाव करण्यात येणार आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडवर पाच हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची नजर
त्याबाबतची माहिती आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली. कर वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्याबरोबरच उत्पन्न वाढ करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात २०० मिळकतींचा लिलाव केला जाईल. त्याची प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कर आकारणी आणि कर संकलन विभागाला अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच थकबाकीच्या न्यायप्रविष्ठ प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी कंत्राटी स्वरूपात वकिलांची नियुक्ती केली जाणार आहे, असे आयुक्त कुमार यांनी सांगितले.