पुणे : ‘सध्या कवितेचा स्फोट होत असून कथेचा संकोच होत आहे. कादंबरी हे आशयसंपन्न विणलेले वस्त्र असते. कथा हे ताकदीचे भावविश्व असून लेखक आपल्या प्रतिभेच्या चिमटीतून कथानक मांडत असतो,’ असे मत प्रसिद्ध लेखक डाॅ. आशुतोष जावडेकर यांनी रविवारी व्यक्त केले.
सुरेश एजन्सी आणि भावार्थ यांच्यातर्फे डाॅ. अरुणा ढेरे लिखित आणि डाॅ. वंदना बोकील-कुलकर्णी संपादित ‘सीतेची गोष्ट आणि इतर निवडक कथा’ या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीचे प्रकाशन डाॅ. आशुतोष जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी जावडेकर बोलत होते. सुरेश एजन्सीचे बाळासाहेब कारले आणि भावार्थच्या जोशी या वेळी उपस्थित होत्या. ‘सीतेची गोष्ट’ या कथेचे अभिवाचन करून वंदना बोकील-कुलकर्णी यांनी या कथेचे सौंदर्य उलगडले.
जावडेकर म्हणाले, ‘कथा ही कोणाच्या मालकीची नसते. तर ती सांगणाऱ्याची आणि वाचणाऱ्याची व ऐकणाऱ्याची असते. या कथांमधून डाॅ. ढेरे यांनी स्त्रीजीवनाविषयीचा ऊहापोह केला असला तरी पुरुष व्यक्तिरेखा समजून-उमजून रेखाटल्या आहेत. अरुणाताईंच्या कथेने मराठी कथेला आदिबंधात्मक स्वरूपाचे वेगळे वळण दिले आहे.’
कोणत्याही साहित्यकृतीसाठी तर्काने होणारी सुरुवात आणि शेवट महत्त्वाचा असतो, असे सांगून वंदना बोकील-कुलकर्णी म्हणाल्या, ‘या लेखनाला लोकसाहित्याचे पदर आहेत. मुलीचा विवाह करून तिला अयोध्या नगरीमध्ये दिले तर तिच्या नशिबी वनवास येतो, अशी समजूत आजही त्या भागात आहे. इतिहास केवळ पुरुषांच्या दृष्टिकोनातून लिहिला जातो. त्याकाळच्या बायका काय करत होत्या याचा वेध कोणीच घेतलेला नाही. ती उणीव दूर करण्याचे काम ढेरे यांच्या ‘सीतेची गोष्ट’ कथेने केले आहे.’