पुणे : रिक्षाचालकाने प्रवासी महिलेशी अश्लील कृत्य केल्याची घटना लोहगाव परिसरात घडली. याप्रकरणी पसार झालेल्या रिक्षाचालकाविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला लोहगाव परिसरातून ९ एप्रिल रोजी दुपारी तीनच्या सुमारास घरी निघाली होती. लोहगाव-वडगाव शिंदे रस्त्यावर रिक्षाचालकाने एका इमारतीजवळ रिक्षाचा वेग कमी केला. प्रवासी महिलेशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. महिलेने आरडाओरडा केल्यनंतर रिक्षाचालकाने घाबरुन रिक्षा थांबविली.
घाबरलेली महिला रिक्षातून उतरली. रिक्षाचालक तेथून पसार झाला. महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. महिलेने रिक्षाचालकाचे वर्णन आणि वाहन पाटीवरील क्रमांक पोलिसांना दिला आहे. पसार झालेल्या रिक्षाचालकाचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस नाईक जे. के. दरवडे तपास करत आहेत.
खासगी कंपनीतील अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा
खराडी भागातील एका खासगी कंपनीतील अधिकाऱ्याने सहकारी महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका महिलेने खराडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी खासगी कंपनीत प्रशासकीय अधिकारी आहे. तक्रारदार महिला खासगी कंपनीत कर्मचारी आहे. महिला कंपनीत सोडण्याचा बहाणा करुन प्रशासकीय अधिकाऱ्याने मोटारीत अश्लील कृत्य केले. महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार प्रशासकीय अधिकाऱ्याविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक वैशाली तागंडे तपास करत आहेत.