पुणे : हडपसर भागात मांजरीतील एका गोदामात आग लागून स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्परतेने आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. गोदामात बेकायदा गॅस सिलिंडरचा साठा करण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. मांजरीतील बेल्हेकर वस्ती परिसरात एका गोदामात बेकायदा गॅस सिलिंडरचा साठा करुन ठेवण्यात आला होता. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गोदामात आग लागली.
हेही वाचा : अपघातग्रस्त महिला व चिमुकल्यांना आमदार अश्विनी जगतापांनी केली मदत, स्वत:च्या गाडीतून नेले रुग्णालयात
एकापाठोपाठ सहा सिलिंडरचे स्फोट झाल्याने परिसरात घबराट पसरली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी तातडीने गोदामातील सिलिंडर बाहेर काढले. पाणी तसेच अग्निशमन यंत्रणेतील फोमचा मारा करुन आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला. गोदामात आग लागल्यानंतर कामगार बाहेर पळाल्याने त्यांना दुखापत झाली नाही. बेल्हेकर वस्तीत गॅस सिलिंडर ठेवण्यासाठी बेकायदा गोदाम उभे करण्यात आले होते. सिलिंडरमध्ये गॅस भरताना गळती होऊन आग लागल्याची माहिती मिळाली आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.