पुणे : उपनगरी रेल्वे स्थानकांच्या फलाटांवर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना तिथे स्वयंपाक करण्यास मनाई करण्यात आली आहे. या विक्रेत्यांना फलाटावर खाद्यपदार्थ बनवता येणार नाहीत. हे विक्रेते खाद्यदार्थ तयार करून आणून त्यांची विक्री करू शकतात. रेल्वे स्थानक अथवा आवारात आगीच्या घटना घडू नयेत, यासाठी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने हा निर्णय घेतला आहे. यानुसार उपनगरी स्थानकांच्या फलाटांवर सर्व प्रकारच्या स्वयंपाकास बंदी असेल. याचवेळी उपनगरी वगळता इतर स्थानकांवर विजेच्या उपकरणांचा वापर करून स्वयंपाक करता येईल. सर्व परवानाधारक फूड प्लाझा, फास्ट फूड स्टॉल, जनआहार कँटीन, चहा स्टॉल आणि इतर खाद्यपदार्थ विक्रेत्यांना रेल्वेने फलाटांवर स्वयंपाक बंद करण्याची सूचना केली आहे. या नवीन नियमाचा फटका पुणे, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, कासारवाडी, पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, देहू रोड, भेगडेवाडी, तळेगाव, वडगाव, कामशेत आणि मळवली या स्थानकांवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना बसणार आहे.

हेही वाचा : पिंपरी- चिंचवडकरांना आणखी किती दिवस दिवसाआड पाणी? प्रशासनाची मोठी माहिती

उपनगरी आणि इतर गाड्या अशा दोन्ही प्रकारच्या गाड्या येणाऱ्या स्थानकांवर उपनगरी वगळता इतर गाड्या सुटणाऱ्या फलाटांवर स्वयंपाकास परवानगी असेल. अशा स्थानकातील दोन्ही प्रकारच्या गाड्या येणाऱ्या फलाटांवर स्वयंपाकास बंदी असेल. याची अंमलबजावणी तातडीने सुरू करण्यात यावी, असे आदेश वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांनी दिले आहेत. मात्र, खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी हा नियम व्यवसायासाठी मारक असल्याचा दावा केला आहे. अनेक विक्रेत्यांनी हा नियम व्यवहार्य नसल्याची टीका केली आहे.

हेही वाचा : प्रवाशांना खुणावतोय ‘व्हिस्टाडोम’, प्रवासादरम्यान आनंद घ्या निसर्ग सौंदर्य अन् नयनरम्य दृश्यांचा!

“खाद्यपदार्थ विक्रेत्यांना फलाटावर स्वयंपाकास बंदी घालण्याचा रेल्वेने घेतलेला निर्णय चुकीचा आहे. सुरक्षिततेच्या नावाखाली रेल्वेचे अधिकारी अयोग्य पावले उचलत आहेत. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे.” – हर्षा शहा, अध्यक्षा, रेल्वे प्रवासी ग्रुप

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune ban on cooking on railway platforms affects hot tea and vada pav in trains pune print news stj 05 css
Show comments