पुणे : नोकरी, तसेच पुण्यात फिरायला नेण्याच्या आमिषाने बांगलादेशातील एका १६ वर्षीय युवतीची बुधवार पेठेतील कुंटणखान्यात पाच लाखांंना विक्री करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. डांबून ठेवलेल्या युवतीने स्वत:ची सुटका करून घेतली. त्यानंतर रिक्षातून हडपसर भागात पोहोचलेल्या युवतीने या घटनेची माहिती पोलिसांना दिली.
फरासखाना पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेला अटक केली असून तिच्याबरोबर असलेल्या साथीदारांना अटक करण्यात आली आहे. याबाबत युवतीने फिर्याद दिली आहे.
युवतीला मैत्रिणीने डिसेंबर महिन्यात भारतात फिरायला नेण्याचे आणि पुण्यात नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर मध्यस्थांमार्फत युवती आणि मैत्रिणीने नदी ओलांडून भारतात प्रवेश केला. मैत्रिणीबरोबर ती रेल्वेतून पुण्यात आली. सुरुवातीला ती चाकण भागात राहायला होती. त्यानंतर मैत्रिणीने बुधवार पेठेतील कुंटणखाना मालकिणीशी संपर्क साधला. युवतीची तीन लाख रुपयांत विक्री केली.
युवतीला बुधवार पेठेतील एका लाॅज, तसेच कुंटणखान्यात डांबून ठेवले. युवतीकडील मोबाइल संच कुंटणखाना मालकिणीने काढून घेतला होता. त्यामुळे तिला कोणाशी संपर्क साधता येत नव्हता. तिला कुंटणखाना मालकिणीसह साथीदार महिलांनी वेश्याव्यवसायास प्रवृत्त केले, तसेच बांगलादेशी असल्याने पोलिसांच्या ताब्यात देऊ, अशी धमकी तिला देण्यात आली होती. अखेर कोणाचे लक्ष नसल्याची संधी साधून ती पळाली. रिक्षातून ती हडपसर भागात आली. तिने हडपसर पोलिसांकडे या प्रकाराबाबत माहिती दिली. त्यानंतर हडपसर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन फरासखाना पोलिसांकडे तपाससााठी सोपविला. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे तपास करत आहेत.
बांगलादेशी युवतीला आमिष दाखवून तिला भारतात आणण्यात आले. याप्रकरणी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.
प्रशांत भस्मे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, फरासखाना पोलीस ठाणे</strong>