पुणे : बिबवेवाडी भागात दहशत माजविणाऱ्या गुंडाविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले. गुंडाला वर्षभरासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे.
सनी संतोष भरगुडे (वय २४, रा. निलेश काॅम्प्लेक्स, योगायोग सोसायटी, बिबवेवाडी) असे कारवाई केलेल्या गुंडाचे नाव आहे. भरगुडेविरुद्ध बिबवेवाडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे, बाललैंगिक अत्याचार, तसेच दरोड्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हे दाखल आहेत.
हेही वाचा : ‘दादा कचऱ्याची गाडी येत नाही’, भरकार्यक्रमात महिलेची तक्रार, अजित पवारांनी दिलं मिश्किल उत्तर, म्हणाले…
भरगुडे याच्या विरुद्ध झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्याचा प्रस्ताव बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक सविता ढमढेरे, गुन्हे प्रतिबंधक शाखेचे पोलीस निरीक्षक ए. टी. खोबरे यांनी तयार केला होता. पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी प्रस्तावास मंजुरी देऊन भरगुडेला वर्षभरासाठी अमरावती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले.