पुणे: राज्यातील महिला वर्गासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणल्यानंतर महाविकास आघाडीतील नेत्यांनी या योजनेबाबत अनेक मुद्दे उपस्थित करीत महायुतीमधील नेत्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. यावरून दोन्ही बाजूने आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळाले. तर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान देखील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांकडून हा मुद्दा उपस्थित केला जात असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घोषणा पत्र जाहीर केले आहे. त्यामध्ये महायुतीच सरकार आल्यावर लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना १५०० ऐवजी २१०० रुपये दिले जातील अशी घोषणा केली आहे. या घोषणेची आज दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा ऐकण्यास मिळाली.
त्या सर्व घडामोडी दरम्यान आज भाजपाचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील पर्वती विधानसभा मतदार संघाच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रचारार्थ आले होते. त्यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महाविकास आघाडीतील नेत्यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, लाडकी बहीण योजना अंमलात आणली त्यावेळेस आमच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करून योजना फसवी असल्याचे सांगण्यात आले. मात्र या योजनेच्या राज्यातील अडीच कोटी महिला लाभार्थी ठरल्या आहेत. त्या सर्व महिलांच्या खात्यात आतापर्यंत पैसे जमा झाले आहेत. तसेच महाविकास आघाडीचे नेते लाडकी बहीण योजनेच्या विरोधात असून त्यांनी न्यायालयात देखील दाद मागून योजना म्हणजे पैशाचा चुरडा असल्याचे सांगितले. पण आम्ही योजना बंद होऊ दिली नाही आणि भविष्यात देखील लाडकी बहीण योजना बंद करणार नसल्याचे सांगत विरोधकांना चांगलेच सुनावले.
हेही वाचा : पुणे: रामटेकडीत डंपर, जेसीबी यंत्र पेटवून देण्याची घटना; ठेकेदाराकडून पोलिसांकडे तक्रार
यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, आमदार पंकजा मुंडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार माधुरी मिसाळ, माजी मंत्री विजय शिवतारे, अमित गोरखे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.