पुणे : देशभरात दिवाळी सण मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जात आहे. त्याच दरम्यान कोथरूडचे ठाकरे गटाचे माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांनी दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला सर्व पक्षीय नेत्यांनी हजेरी लावून मिसळ पाव, जिलेबी खाण्याचा आनंद लुटला. तर यावेळी राजकारणाच्या पलीकडे जाऊन गप्पा ऐकण्यास मिळाल्या. तसेच कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते कोथरूडचे आमदार आणि मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी हजेरी लावून सर्वांशी गप्पा मारत, त्यांनी देखील मिसळ खाण्याचा आनंद लुटला.
तर मागील चार वर्षांमध्ये ठाकरे गट आणि भाजप नेत्यांमधील आरोप प्रत्यारोप आजपर्यंत पाहण्यास मिळाले. पण दिवाळी सणांच्या निमित्ताने पुण्यात चंद्रकांत पाटील आणि चंद्रकांत मोकाटे हे एकत्रित आल्याने विविध राजकीय चर्चाना उधाण आल्याचे पाहण्यास मिळाले. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपली एक संस्कृती आहे. ती म्हणजे पक्ष कोणताही असला तरी सर्व उत्सव एकत्रितपणे साजरे केले पाहिजे. ती संस्कृती चंद्रकांत मोकाटे पाळत असून सर्वपक्षीय नेत्यांना दिवाळी फराळाकरिता त्यांनी बोलावले आहे. त्यामुळे यामधून काही राजकीय अर्थ काढू नये आणि राजकीय अर्थ निघतो तो काही जाहीरपणाने निघत नसल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : सत्तांतरणानंतर शिवभोजन केंद्रांना टाळे… पुणे, पिंपरी-चिंचवडमधील ही केंद्रे बंद
“महाराष्ट्राचे राजकारण एवढ्या पातळीपर्यंत कधीच गेले नव्हते”
सध्याच्या राजकारणात एकमेकांवर आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळतात. त्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले की, शरीरामध्ये कोणतीही अननॅचरल गोष्ट फार काळ टिकत नाही आणि ती बाहेर पडते. ती गोष्ट शरीरात असते. ती सारखे अस्वस्थ करीत राहते. त्यामुळे महाराष्ट्र एक शरीर मानलं, तर एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन आरोप प्रत्यारोप करणं हे अननॅचरल आहे. काल खासदार संजय राऊत जे म्हणाले आहेत, आपण ते खासगीमध्ये देखील बोलू शकत नाही. ते एवढे कसे काय बोलू शकतात, हा एक प्रश्नच आहे.आता लोकच म्हणतील काय बोलतात, आता भाजपाला बोलण्याची आवश्यकता नाही. अशी भूमिका मांडत चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावला.
हेही वाचा : ‘पुणेकर’ असल्याचा सुनील देवधरांचा प्रचार; लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने गाठीभेटी सुरू
तसेच ते पुढे म्हणाले की, सध्या जे काही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर कोणी तरी पुढाकार घेऊन शब्दांची, व्यवहारांची आचारसंहिता ठरवावी लागेल. तसेच महाराष्ट्राचे राजकारण एवढ्या पातळीपर्यंत कधीच गेले नव्हते असे सांगत पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे पाटील यांनी संजय राऊत यांना टोला लगावला. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात सभा घेत आहे. त्यामुळे आरक्षणाचा प्रश्न केव्हापर्यंत मार्गी लागु शकतो? असा प्रश्न विचारताच चंद्रकांत पाटील म्हणाले की, महिनाभरात प्रश्न मार्गी लागेल अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.