पुणे : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा बिमोड करून शत्रूला भरपूर चोख उत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती द्यावी, अशी प्रार्थना गणरायाच्या चरणी केली असल्याचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी शनिवारी सांगितले.
जे. पी. नड्डा यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराला भेट देऊन गणरायाचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते गणरायाला अभिषेक करण्यात आला. त्यानंतर नड्डा यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्याप्रसंगी ते बोलत होते.
केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस आमदार हेमंत रासने, उत्सवप्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, भाजप शहर सरचिटणीस राजेश पांडे, माजी नगरसेवक अजय खेडेकर या वेळी उपस्थित होते. ट्रस्टच्या वतीने नड्डा यांचा सत्कार करण्यात आला.