पुणे : “लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी दिल्यास मी निश्चित निवडणूक लढवेल आणि जिंकेल. पुण्यातून देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणूक लढवली किंवा त्यांच्या वरीष्ठ नेत्यांनी जरी निवडणूक लढवली तरी मी जिंकेल. कसबा विधानसभा निवडणूक नागरिकांनी हातामध्ये घेतल्यावर काय होते, हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे पुणेकर नागरिक लोकसभा निवडणुकीत माझ्या पाठीशी उभे राहतील”, अशी प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी दोन दिवसांपूर्वी दिली होती. त्यावरून पुणे शहराचे राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली असून भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी रवींद्र धंगेकर यांच्या विधानाचा खरपूस समाचार घेत, पुणे लोकसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकरांना देवेंद्र फडणवीसांचे कार्यकर्तेच खूप झाले, असा टोला देखील रवींद्र धंगेकर यांना त्यांनी लगावला.
संजय काकडे म्हणाले की, पुणे लोकसभेसाठी माझ्यासह अन्य चार जण इच्छुक आहेत. त्यामुळे आम्ही सर्वजण मतदारसंघात तयारी करत आहोत, पक्षात इच्छुकांची संख्या अधिक असणे ही चांगली बाब आहे. यामुळे कायम कार्यकर्त्यांमध्ये इच्छुक व्यक्ती नवचैतन्य निर्माण करत असतो. आगामी निवडणुकीत भाजपकडून ज्याला संधी दिली जाईल. तो उमेदवार प्रचंड मतांनी निवडून येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा : पुणे : मार्केट यार्डमध्ये शुकशुकाट; कामगार संघटनांकडून बंद
तसेच ते पुढे म्हणाले की, रवींद्र धंगेकर हे माझे चांगले मित्र असून व्यक्तीमत्व चांगलं आहे. पंरतु, ही निवडणूक लोकसभेची आहे. महापालिका किंवा आमदारकीची नाही. कसबा विधानसभा मतदार संघात त्यांचे २५ वर्ष काम होते. त्यामुळे रवींद्र धंगेकर हे निवडून आले आहेत. त्या निवडणुकीत हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी निवडणूक झाली. त्यामध्ये रवींद्र धंगेकर हे जिंकले आहेत. काँग्रेस पक्ष जिंकला नाही किंवा भाजप हरला नाही. तर रवींद्र धंगेकर हे त्यांच्या कामामुळे निवडून आले. तसेच त्या निवडणुकीत आमच्या काही चुका झाल्या असतील,पण लोकसभा निवडणुकीचा विचार करायचा झाल्यास, ६ विधानसभा मतदार संघातील २५ लाख मतदार असतात. त्यामध्ये जाळे निर्माण करणे कठीण असते आणि आमच्या पक्षाचे जाळे मोठ्या प्रमाणावर आहे. तसेच दोन दिवसांपूर्वी पुणे लोकसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस उभे राहिले तरी मीच जिंकणार, अशा प्रकारचे विधान रवींद्र धंगेकरांनी केले होते. मी रवींद्र धंगेकर यांना एकच सांगू इच्छितो की, पुण्यात देवेंद्र फडणवीस यांचे माझ्यासह काही कार्यकर्ते आहेत. तेवढेच रवींद्र धंगेकर यांना लोकसभा निवडणुकीत खूप झाल्याचे सांगत संजय काकडे यांनी रवींद्र धंगेकरांना टोला लगावला.