पुणे: लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने प्रत्येक राजकीय पक्षाकडून प्रचार सभा, रॅलीचे आयोजन केले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभांचा एकच धडाका लावल्याचे पाहण्यास मिळत आहे. तर पुण्यातील वानवडी येथील रेस कोर्स मैदानावर पुणे, शिरूर, बारामती आणि मावळ या चार लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महाविजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ही सभा आज सायंकाळी ५ वाजून ३० मिनिटांनी होणार आहे. तर या सभेला महायुतीचे जवळपास दोन लाख कार्यकर्ते उपस्थित राहतील अशी शक्यता भाजप नेत्यांकडून व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : करोना संकटानंतर नवीनच धोका वाढला! जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा
तर या सभेदरम्यान पुणे लोकसभा मतदार संघाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘दिग्विजय पगडी’ आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारुढ पुतळा आणि तलवार भेट देऊन स्वागत करणार आहेत. या ‘दिग्विजय पगडी’ बाबत मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ऐतिहासिक मराठा शौर्याची साक्ष देणाऱ्या, मोत्यांचा तुरा असलेल्या, शुभचिन्हे लावलेल्या आणि पंचधातूंनी सजवलेल्या या विशेष पगडीच्या शीर्षस्थानी साक्षात तुळजाभवानीची प्रतिमा आहे. दिग्विजयाला साजेशा सात घोड्यांच्या मंचकाची संकल्पना यातून प्रतीत होते. त्यामुळे तिला दिग्विजय योद्धा पगडी नाव दिले गेले आहे. तसेच ते पुढे म्हणाले की, मोदीजींचे आजवर अनेक पुणे दौरे झाले, त्यात त्यांचे विविध पगड्या घालून स्वागत केले आहे. पण आजची पगडी निश्चितच विशेष आहे. दिग्विजयाची साक्ष देणारी ही पगडी आपल्या मराठी परंपरेचा बाज आणि शौर्य दर्शविणारी असल्याचे त्यांनी सांगितले.