पुणे : लोकसभा निवडणुकीला जवळपास दीड महिन्यांचा कालावधी राहिला असून राज्यात अद्यापपर्यंत कोणत्याही पक्षाचे जगावाटप पूर्णपणे झाले नाही. तर प्रत्येक राजकीय पक्षाकडून चर्चाच सुरू आहे. या सर्व घडामोडी दरम्यान राज्यातील सर्व जनतेचे लक्ष लागून असलेल्या बारामती लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर महायुतीकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची अद्यापपर्यंत घोषणा जरी झाली नसली तरी सुनेत्रा पवार यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.मात्र या सर्व घडामोडींदरम्यान २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे अजित पवार यांच्या विरोधात सातत्याने भूमिका मांडत होते. मात्र, आठ महिन्यापूर्वी भाजप आणि शिवसेना सरकार सोबत अजित पवार यांनी जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गोपीचंद पडळकर हे अजित पवार यांच्या विरोधात भूमिका मांडताना दिसले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सर्व घडामोडी दरम्यान गोपीचंद पडळकर हे पुणे दौर्‍यावर होते.त्यावेळी सध्याच्या राजकीय घडामोडी बाबत ते म्हणाले की,मागील दहा वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली देश प्रगती पथावर आहे.त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीत तिसर्‍यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होतील आणि आम्ही देशात ४०० पार खासदाराचा आकडा पार करणार, तर राज्यात महायुती ४५ पेक्षा अधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच ते पुढे म्हणाले की, मागील दहा वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारने धनगर समाजाच्या दृष्टीने निर्णय घेतले आहे. त्याबाबत सांगायचे झाल्यास अहमदनगरचे अहिल्यादेवी नगर करण्याचा निर्णय घेतला आहे. यासह अनेक निर्णय घेतले असल्याने राज्यातील धनगर समाज महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी नक्कीच राहिल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे यांचे बंड झाले थंड… ‘वर्षा’वर काय घडले?

महायुतीकडून राज्यात अनेक जागांबाबत तिढा कायम आहे. तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, मागील दोन वर्षांपासून भाजपने बारामती लोकसभा मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्या काळात केंद्रातील अनेक नेत्यांनी बारामतीचा दौरा देखील केला आहे. या मतदार संघावर देवेंद्र फडणवीस यांचं अधिक लक्ष असल्याने ही जागा अधिक फरकाने जागा जिंकून येईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा : पुण्यात काँग्रेसला स्वकियांचाच धोका, केंद्रीय पथक दाखल

मागील आठ वर्ष अजित पवार यांच्या विरोधात तुम्ही भूमिका मांडत राहिला. पण आठ महिन्यांत अजित पवार यांच्या विरोधात एक ही भूमिका मांडली नाही. त्यामुळे अजित पवार आणि तुमच्या दिलजमाई झाली का? त्या प्रश्नावर ते म्हणाले की, मागील काही महिन्यांत राजकारणात अनेक स्थित्यंतरं झाली आहेत. वरीष्ठ पातळीवर युती झालेली आहे.तर मी भाजपचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे इतर पक्षाशी भेटणं,बोलण्याचा काही प्रसंग येत नाही. माझे नेते देवेंद्र फडणवीस असून ते खंबीर आहेत. तसेच माझं त्यांच्याकडे (अजित पवार) काही कामच नाही आणि त्यांच्या सोबत भेट देखील झाली नाही, असे पडळकरांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune bjp mla gopichand padalkar said that mahayuti will win at baramati lok sabha seat svk 88 css