पुणे : अंध विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी लेखनिकाची गरज भासते. मात्र, लेखनिक मिळण्यात अनेक अडचणी येतात. या समस्येवर उपाय म्हणून निवांत अंध मुक्त विकासालय संस्थेने उपयोजन विकसित केले असून, टंकलेखनाद्वारे विद्यार्थ्यांना लेखनिकाशिवाय परीक्षा देणे शक्य झाले आहे. मॉडर्न महाविद्यालयात त्याबाबतचा प्रयोग यशस्वीही झाला आहे. निवांत अंध मुक्त विकासालय ही संस्था गेली ३५ वर्षे अंध विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे. दहावीनंतर या संस्थेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळेपर्यंत पाठबळ दिले जाते. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत साडेतीन हजारांहून अधिक विद्यार्थी पदवीधर झाले आहेत. अंध विद्यार्थ्यांना लेखनिक मिळण्यात अडचणी येतात. काही वेळा लेखनिकाच्या चुकांमुळे विद्यार्थ्यांचे गुण जातात. महाविद्यालयांनाही अंध विद्यार्थ्यांना लेखनिक पुरवणे कठीण होत आहे. बहुतांश अंध विद्यार्थी मराठी माध्यमाचे असतात. लेखनिक मिळण्याची अडचण लक्षात घेऊन अंध विद्यार्थ्यांना देवनागरी टंकलेखन शिकवण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला. त्यासाठी स्वलेखन टायपिंग ट्युटर हे उपयोजन २०१९मध्ये तयार करण्यात आले. त्यानंतर राज्यभरातील १६ शाळांतील एक हजार मुलांना टंकलेखन शिकवण्यात आले. ७८ धड्यांद्वारे कळफलकाची ओळख, टंकलेखन, संपादन शिकवले जाते.
स्वयंशिक्षण स्वरूपाचे हे उपयोजन आहे. टंकलेखनाचे प्रशिक्षण घेतलेले अंध विद्यार्थी आता मार्गदर्शन करतात, अशी माहिती उपयोजनाच्या सहसंस्थापिका उमा बडवे यांनी दिली. टंकलेखन शिकवण्याच्या उपयोजनासह स्वलेखन टेस्ट हे उपयोजन परीक्षेसाठी तयार केले आहे. मॉडर्न महाविद्यालयातील सूरज वाघमारे या टंकलेखन येणाऱ्या विद्यार्थ्याला लेखनिकाशिवाय स्वतः परीक्षा देण्याची इच्छा होती. त्याबाबत मॉडर्न महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र झुंजारराव यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने प्रायोगिक तत्त्वावर त्या विद्यार्थ्याची यशस्वीरीत्या परीक्षा घेण्यात आली. त्यामुळे आता अंध विद्यार्थी टंकलेखन प्रशिक्षणानंतर स्वतः परीक्षा देऊ शकतात. टंकलेखन शिकल्याने विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्यासाठीही फायदा होऊ शकतो, असेही त्यांनी सांगितले. टंकलेखन करून परीक्षा देण्याबाबत शुभम वाघमारे म्हणाला, की लेखनिक मिळत नसल्याने माझीही अडचण झाली होती. मात्र, टंकलेखन करून परीक्षा देणे ही खूप चांगली संधी आहे. कोणतीही अडचण न येता परीक्षा देता आली.
हेही वाचा : “एवढं करुन जर मस्ती असेल तर ती पोलिसी खाक्या…”, पुण्यातील गुंडांना अजित पवारांचा थेट इशारा
“अंध विद्यार्थ्यांना लेखनिक मिळण्यात अनेक अडचणी येतात. त्यामुळे अंध विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान वापरण्याचा प्रयत्न सुरू होता. करोना काळात वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या परीक्षा सॉफ्टवेअरद्वारे, लेखनिकाशिवाय घेण्याचा प्रयोग केला. स्पीच टू टेक्स्ट तंत्रज्ञान वापरूनही प्रायोगिक तत्त्वावर परीक्षा घेण्यात आली. मात्र, त्यात काही त्रुटी राहत असल्याने उत्तरपत्रिका तपासण्यात अडचणी येतात. निवांत अंध मुक्त विकासालय संस्थेने त्यांची प्रणाली वापरण्याबाबत विचारणा केल्यावर त्या प्रणालीच्या सर्व तांत्रिक बाजू तपासून घेण्यात आल्या. प्रायोगिक तत्त्वावर एका विद्यार्थ्याची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आल्या. त्याच वेळी तो प्रयत्न फसल्यास विद्यार्थ्याची पारंपरिक पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी लेखनिकही उपस्थित होता. मात्र, ती परीक्षा विनाअडथळा पूर्ण झाली. विद्यार्थ्याला व्यवस्थित टंकलेखन करता आले. त्यामुळे आता अन्य विद्यार्थ्यांसाठी टंकलेखनाचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. अन्य महाविद्यालयांनीही अंध विद्यार्थ्यांना टंकलेखनाचे प्रशिक्षण दिल्यास लेखनिकाशिवाय अंध विद्यार्थी स्वतः परीक्षा देऊ शकतात.” – डॉ. राजेंद्र झुंजारराव, प्राचार्य, मॉडर्न कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, शिवाजीनगर
हेही वाचा : गुगलसोबत ‘एआय फॉर महाराष्ट्र’! जाणून घ्या कृत्रिम प्रज्ञेचा वापर करून नेमकं काय घडणार…
अन्य भाषांमध्येही…
देवनागरी टंकलेखनाचे उपयोजन आता इतर भाषांमध्येही उपलब्ध होणार आहे. नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) या संस्थेने हिंदीमध्ये, तसेच केरळ सरकारने मल्याळम् भाषेत उपयोजन उपलब्ध करण्याची मागणी केली आहे. तसेच इंग्रजीतही उपयोजन उपलब्ध केले जाणार आहे. अंध विद्यार्थ्यांना स्वयंपूर्ण करण्यासाठी हे उपयोजन उपयुक्त ठरू शकते, असेही बडवे यांनी सांगितले.