पुणे : देशातील प्रतिष्ठित प्रगत संगणन विकास केंद्रातर्फे (सी-डॅक) संगणक आणि तंत्रज्ञानाशी संबंधित विविध अभ्यासक्रम राबवण्यात येतात. मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा सीडॅकच्या कॅम्पस प्लेसमेंटला फटका बसला असून, प्लेसमेंटचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटल्याचे स्पष्ट झाले आहे. सी-डॅकचे कार्यकारी संचालक कर्नल (नि.) ए. के. नाथ यांनी ही माहिती दिली. अभियांत्रिकी पदवीनंतर सहा महिने मुदतीने पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सी-डॅकतर्फे राबवले जातात. एकूण ५५०० जागांसाठी दहा हजारांहून अधिक अर्ज येतात. त्यात कृत्रिम बुद्धिमत्ता, जीआयएस, वेब डिझाइन, मोबाइल कॉम्प्युटिंग, जावा-पायथन अशा अभ्यासक्रमांचा समावेश असतो. त्यात काही अभ्यासक्रम ऑनलाइन, तर काही पारंपरिक पद्धतीने होतात. हे अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट केल्या जातात. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांकडून या विद्यार्थ्यांना नोकरी दिली जाते. मात्र, यंदा कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेला फटका बसला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाथ म्हणाले, की सीडॅकमधील अभ्यासक्रम रोजगारक्षम म्हणून ओळखले जातात. त्यामुळे दरवर्षी कॅम्पस प्लेसमेंटद्वारे नोकरी मिळणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८५ टक्क्यांपेक्षा जास्त असते. करोना काळात कंपन्यांकडून प्रचंड प्रमाणात भरती प्रक्रिया करण्यात आली. त्यावेळी कंपन्यांना उमेदवार मिळत नसल्याची स्थिती होती. मात्र, सध्या सुरू असलेल्या कॅम्पस प्लेसमेंट प्रक्रियेला फटका बसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत ४५ टक्केही प्लेसमेंट झालेल्या नाहीत. करोना काळात झालेल्या प्रचंड भरतीनंतर आता परिस्थिती सर्वसाधारण होत आहे. पारंपरिक अभ्यासक्रमांच्या तुलनेत ऑनलाइन अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद कमी आहे. त्यामुळे येत्या काळात मिश्र पद्धतीचे अभ्यासक्रम सुरू करण्याची योजना असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा : पुणे: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीची आत्महत्या; शरीरावर मारहाणीचे व्रण

चिखलीमध्ये शैक्षणिक केंद्र

सी-डॅकला राज्य सरकारने चिखली येथे दहा एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेत आता स्वतंत्र शैक्षणिक केंद्रांची निर्मिती केली जाणार आहे. या इमारतीचे बांधकाम येत्या दोन वर्षांत पूर्ण केले जाणार आहे. इमारतीचे काम पूर्ण झाल्यानंतर सर्व अभ्यासक्रमांचे कामकाज या इमारतीमध्ये स्थलांतरित केले जाणार आहे. त्याशिवाय विदा केंद्राचीही उभारणी केली जाणार असल्याची माहिती नाथ यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune c dac campus placements and job opportunities declined this year pune print news ccp 14 css