पुणे : हडपसर विधानसभा मतदारसंघातील मांजरी बु. येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मांजरी नळ पाणी पुरवठा प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास आले. गाडीमधून उतरताच आमदार चेतन तुपे आणि जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत चर्चा करीत प्रकल्पाच्या ठिकाणी अजित पवार हे जात होते. अजित पवार यांच्या अगदी जवळ असलेल्या प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीचा कॅमेरा काही समजण्याच्या आतमध्ये अजित पवार यांच्या डोक्याला लागल्याची घटना घडली. त्यानंतर अजित पवार हे डोक्याला हात लावून कॅमेरामॅनकडे पाहत पुढे निघून गेले.
यावेळी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता बाप्पा बहीर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, अधीक्षक अभियंता वैशाली आवटे, डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते.
हेही वाचा : नवीन वर्षात प्रवाशांना खुशखबर! पुणे मेट्रोच्या प्रवासी सेवेचा विस्तार
मांजरी बु. भागातील पाण्याची समस्या लवकरात लवकर सोडवा, अजित पवारांच्या अधिकार्यांना सूचना
मांजरी बु. परिसरातील पाण्याची समस्या लक्षात घेता मांजरी नळ पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करावी. योजनेअंतर्गत पाणी पुरवठ्याची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी महानगरपालिकेने तात्काळ नळ जोडणीची कार्यवाही सुरू करावी. आगामी काळातील लोकसंख्या विचारात घेता रेल्वे क्रॉसिंगच्या बाजूला एक अतिरिक्त पाईपलाईन करावी. महानगरपालिकेने या योजनेची उर्वरीत कामे लवकरात लवकर पूर्ण करुन या भागातील नागरिकांची पाण्याची समस्या सोडवावी, अशा सूचना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकारी वर्गाला केल्या.