पुणे : विधी महाविद्यालय रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांवर चंदन चोरट्यांनी हल्ला केल्याची घटना नुकतीच घडली. स्वसंरक्षणार्थ पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या चोरट्यांवर उपचार करणारे डाॅक्टर गोत्यात आले आहेत. चोरट्यांवर उपचार करणाऱ्या डाॅक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

विधी महाविद्यालय रस्त्यावर २२ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री अडीचच्या सुमारास डेक्कन पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई महेश तांबे, गणेश सातव गस्त घालत होते. अभिनव महाविद्यालय पथ परिसरातील जानकी व्हिला बंगल्याजवळ चंदन चोरटे थांबले होते. पोलिसांना पाहताच चंदन चोरट्यांनी पोलिसांवर हल्ला केला. पोलीस शिपाई तांबे यांनी प्रत्युत्तरादाखल पिस्तुलातून चोरट्यांच्या पायाच्या दिशेने गोळीबार केला. गोळीबारात शाहरुख कादीरखान पठाण, फारुखखान कादीरखान पठाण (रा. जंजाळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) जखमी झाले. याप्रकरणी पोलिसांनी आसिफ हरुनखान गोलवाल (वय २४, रा. जंजाळ, जिल्हा परिषद शाळेजवळ, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) याला अटक केली. या प्रकरणी त्यांचे साथीदार नदीम खान लतीफ खान, फिरोज खान शरीफ खान, नजीम खान सादुखान यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा : पक्षातील बंडखोरीचे काँग्रेस समोर आव्हान!

गोळीबारात शाहरुख आणि फारुखखान पठाण जखमी झाले. जखमी अवस्थेत पठाण दुचाकीवरुन छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचले. पठाण गोळीबारात जखमी झाले आहेत, याबाबतची प्रथम वैद्यकीय माहिती (मेडिको लिगल केस- एमएलसी) डाॅक्टरांनी पोलिसांना दिली नव्हती. डाॅक्टरांनी आरोपींना मदत होईल, असे कृत्य केले. याप्रकरणी डाॅक्टरांविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. पसार झालेल्या आरोपींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune case against doctor who treatment sandalwood thieves injured in police firing pune print news rbk 25 css