पुणे : राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी वडापाव विक्रेत्याविरुद्ध चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत महेश आनंदराव कदम (वय ४८, रा. मतेनगर, वडगाव शेरी) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वडापाव विक्रेत्याविरुद्ध राष्ट्रीय सन्मानांचा अपमान प्रतिबंधक कायद्यान्वये २ (जी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्या वडापाव विक्रेता वडगाव शेरी भागात राहायला आहे. वडगाव शेरी भागात तो वडापाव विक्रीची गाडी लावतो. तक्रारदार महेश कदम हे रविवारी (२६ जानेवारी) सकाळी दहाच्या सुमारास वडापाव खाण्यासाठी गेले होते. कदम यांनी त्याला वडापाव बांधून देण्यास सांगितले. वडापाव विक्रेत्याने कदम यांना राष्ट्रध्वजाचे चित्र असलेल्या कागदात वडापाव गुंडाळून दिला. कदम यांच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्यांनी त्याच्याकडे विचारणा केली. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस हवालदार चव्हाण तपास करत आहेत.