पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास तातडीने वैद्यकीय उपचार उपलब्ध होणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागासह महापालिकेचा आरोग्य विभाग यासाठी सज्ज झाला आहे. विसर्जन मिरवणुकीत दोन ठिकाणी रुग्णवाहिकांसह वैद्यकीय पथके तैनात केली जाणार आहेत.
आरोग्य विभागातर्फे मंगळवारी (ता.१७ ) आणि बुधवारी (ता.१८ ) डेक्कन जिमखाना, लक्ष्मी रस्त्यावरील नूतन मराठी विद्यालय येथे रुग्णवाहिकांसह वैद्यकीय पथके तैनात असणार आहेत. या पथकात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, परिचारिकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे पोलीस विघ्नहर्ता न्यासाच्या वतीनेही वैद्यकीय सेवा दिली जाणार आहे. बेलबाग चौक, टिळक चौक, स.प. महाविद्यालय, पुरम चौक, गोखले हॉल, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता या ठिकाणी आपत्कालीन वैद्यकीय मदत पथक असेल. मॉडर्न विकास संस्थेतर्फे लक्ष्मी रस्त्यावरील विजय टॉकीज चौकात वैद्यकीय सेवा दिली जाईल. महाराष्ट्र आपत्कालीन सेवा विभाग आणि भारत विकास ग्रुपतर्फे (बीव्हीजी) चालविण्यात येणाऱ्या १०८ क्रमांकाच्या २३ रुग्णवाहिकाही मिरवणुकीदरम्यान तैनात असतील.
हे ही वाचा…‘चिंचवड भाजपमध्ये केवळ घराणेशाही’, माजी नगरसेवकाचा राजीनामा; ‘आणखी १५’…
महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे यंदा पहिल्यांदाच गणेशोत्सवाच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर येथे तीन खाटांचा अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला. हा विभाग २४ तास सुरू असून, या ठिकाणी एक भूलतज्ज्ञ, ३ वैद्यकीय अधिकारी, १ औषध निर्माता, १ परिचारिका तैनात आहेत. ही सुविधा विसर्जन मिरवणुकीच्या काळातही सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.
हे ही वाचा…पुणे : मिसरूड फुटलेल्या तिघांकडून ,व्यावसायिकावर गोळीबार
आरोग्य विभागाच्या सूचना
- आवाजाची पातळी ७५ डेसिबलपेक्षा जास्त असू नये.
- दोन पथकांमधील अंतर ४०-५० फूट असणे आवश्यक आहे.
- लेझर लाईटचा वापर कटाक्षाने टाळावा.
- रुग्णालये, वृद्धाश्रमांजवळ ध्वनिक्षेपक लावू नये.
- मिरवणुकीदरम्यान रुग्णवाहिकांना ये-जा करण्यास प्राधान्य द्यावे.