पुणे : पुणे महापालिकेसमोर बेकायदा जमाव जमवून समाजात तेढ निर्माण करणारे भाषण केल्याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांच्यासह पुण्यश्लोक पुनर्निर्मिती समितीचे अध्यक्ष कुणाल सोमेश्वर कांबळे, किरण चंद्रकांत शिंदे, विशाल दिलीप पवार यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड शहराचा विकास कोणी केला? शरद पवार की अजित पवार? दोन्ही गटाचे शहराध्यक्ष म्हणाले…
कसबा पेठेतील पुण्येश्वर मंदिर परिसरातील प्रार्थनास्थळावरुन वाद सुरू आहे. पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन करण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. कुणाल कांबळे आणि मिलिंद एकबोटे यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोर जमाव जमवला. दोन समाजात जातीय तेढ निर्माण करणारे भाषण केले. जमावबंदी आदेशाचा भंग केल्याने संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करत आहे.