पुणे : जामीन मिळवण्यासाठी न्यायालायात जामीनदाराचे बनावट आधारकार्ड आणि सातबारा उतारा सादर करणाऱ्या दोघांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश उमेश सूर्यवंशी (वय २९, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव), तसेच सूर्यवंशी (संपूर्ण नाव आणि पत्ता माहित नाही) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. याबाबत योगेश प्रकाश अंबुरे (वय ३८, रा. जांभूळवाडी रस्ता, कात्रज) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिव पवन झंवर याच्याविरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. झंवर याला जामीन मिळवून देण्यासाठी त्याचा भाऊ प्रयत्न करत होता. झंवरच्या भावाला न्यायालयाच्या आवारात सूर्यवंशी भेटला. त्याने साथीदार योगेश सूर्यवंशी याचे नाव आणि क्रमांक दिला. त्यानंतर झंवरच्या भावाने योगेश सूर्यवंशी याच्याशी संपर्क साधला. भावाला जामीन राहणार का, अशी विचारणा केली. झंवर याच्या वकिलांनी योगेश सूर्यवंशी याला शिवाजीनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात हजर केले. यावेळी जामीनदार योगेश सूर्यवंशी याने आपले नाव शंकर भिकू राठोड असल्याचे प्रथमवर्ग न्यायदंडधिकारी बिराजदार यांना सांगितले.

हेही वाचा : Video: ऐतिहासिक घोरपडे घाट…जुन्या पुण्याची गोष्ट सांगणारा अमूल्य वारसा!

न्यायालायने जामीनदाराची माहिती संगणकीय प्रणालीत (सीआयएस प्रणाली) पडताळली. सूर्यवंशी याची समक्ष चौकशी केली. तेव्हा जामीनदाराचे नाव शंकर भिकू राठोड नसून, योगेश उमेश सूर्यवंशी असल्याचे समोर आले. योगेश सूर्यवंशी याने शंकर राठोड याच्या नावाचे बनावट आधारकार्ड आणि सातबारा उतारा तयार केल्याचे तपासात उघडकीस आले. योगेश सूर्यवंशी याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल माने तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune case registered against two for making fake documents and surety to get bail pune print news rbk 25 css