पुणे : पैसे पडल्याची बतावणी करुन बांधकाम व्यावसायिकाच्या मोटारीतून एक लाख रुपयांची रोकड असलेली पिशवी चोरुन नेल्याची घटना कोरेगाव पार्क भागात घडली. याबाबत बांधकाम व्यावसायिक नवनाथ काकडे (वय ४२, रा. काकडे मळा, पूनावाला स्टड फार्मजवळ, थेऊर) यांनी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काकडे बांधकाम व्यावसायिक आहेत. ते मंगळवारी (२३ एप्रिल) ढोले पाटील रस्त्यावरील धर्मादाय आयुक्त कार्यालयात आले होते.

काकडे कामानिमित्त कार्यालयात गेले होते. काकडे यांच्या मोटारीवरील चालक संजय जाधव याने मोटार या परिसरातील उडपी रेस्टोरंटजवळ लावली होती. जाधव मोटारीत बसले होते. त्या वेळी एक चोरटा मोबाइलवर बोलत तेथे आला. त्याने मोटारचालक जाधव यांच्याकडे पैसे पडल्याची बतावणी केली.

जाधव मोटारीतून खाली उतरले. त्यांचे लक्ष नसल्याची संधी चोरट्यांनी साधली. चोरट्याबरोबर असलेल्या साथीदारांनी मोटीरातील आसनावर ठेवलेली एक लाख रुपयांची रोकड, कपडे, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड, ओळखपत्र असा मुद्देमाल ठेवलेली पिशवी चोरुन नेले. तेथे थांबलेल्या अजय खंडेलवाल यांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यांनी याबाबतची माहिती मोटारचालक जाधव यांना दिली. पिशवी चोरुन चोरटे पसार झाले. सहायक फाैजदार सावंत तपास करत आहेत.