पुणे : महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तळेगाव, चाकण, शिक्रापूर परिसरातील महामार्गांचे रूंदीकरण आणि महामार्गांवर उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून ही कामे केली जाणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मावळ तालुक्यातील रस्ते, पाणी योजना, आरोग्यकेंद्र, कार्ला येथील श्री एकवीरा मंदिर परिसरातील विविध कामे, मावळमधील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपमुख्यमंत्री, पालकमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात बैठक घेतली. त्यावेळी रस्ता रुंदीकरण आणि उड्डाणपुल उभारणीला प्राधान्य देण्याची सूचना त्यांनी केली. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, मावळचे आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्यासह पोलीस विभागातील अधिकारी यावेळी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील लोणावळा आणि वडगाव (कान्हे) उपजिल्हा रुग्णालयांची कामे गतीने पूर्ण करण्याची सूचना पवार यांनी केली. लोणावळ्यातील पर्यटकांची आणि कार्ला येथील भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता या दोन्ही ठिकाणी सुरक्षेत्चाय दृष्टीकोनातून पोलीस ठाणी स्थापन करण्यात येणार आहेत. तसेच वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तळेगाव, चाकण, शिक्रापूर परिसरातील महामार्गांचे रुंदीकरण, महामार्गांवर उड्डाणपूल उभारण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहूतक मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्यात येईल. त्यासाठी पुढाकार घेतला जाईल, असे पवार यांनी सांगितले.

कार्ला येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी दरवर्षी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे मंदिर परिसरात भाविकांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी मंदिर परिसराच्या विकासाची कामे करण्यात येत आहेत. वेहेरगाव याथील श्री एकविरा देवी मंदिर येथी फनिक्युलर रोप-वे उभारण्यासंदर्भातील कामांना मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पामुळे अल्पावधीत मंदिरात पोहोचता येणार आहे. त्यामुळे प्रकल्पाची कामे गतीने करावीत, असे पवार यांनी सांगितले.