पुणे : ढगाळ हवामानामुळे राज्यात मंगळवारपासून पुढील तीन दिवस किनारपट्टीवगळता हलक्या सरींची शक्यता आहे. तसेच पुढील पाच दिवस कमाल तापमान एक ते दोन अंश सेल्सिअसने कमी होण्याची शक्यता असल्याने उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज, मंगळवारपासून पुढील तीन दिवस किनारपट्टीवगळता राज्यात हलक्या सरींचा अंदाज आहे. प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. पुढील पाच दिवस राज्यभरात ढगाळ हवामान राहून कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने घट होणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.
हेही वाचा : खुषखबर… म्हाडा लॉटरीला मुदतवाढ, १०० घरेही वाढली
पारा चाळिशीच्या आत
राज्यभरात काहीसे ढगाळ हवामान तयार झाल्यामुळे कमाल तापमान चाळिशीच्या आत आले आहे. सोलापूर ४२ आणि मालेगाव ४१.८ अंश सेल्सिअसचा अपवादवगळता राज्यात पारा ४० अंशांच्या आतच राहिला. विदर्भात तापमानात चांगली घट झाली आहे. ४२ अंशांवर गेलेला पारा ३७ अंशांवर आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरी ३९ अंशांवर तापमान आले आहे. किनारपट्टीवर पारा सरासरी ३३.५ अंश सेल्सिअसवर आहे.