पुणे : शहरात घरफोडी, नागरिकांकडील मोबाइल संच, दागिने चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. चोरट्यांनी चक्क पोलिसांनी जप्त केलेल्या दोन मोटारींचे टायर, दिवे चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. चतु:शृंगी पोलीस ठाण्याच्या आवरात ही घटना घडली. याबाबत सहायक पोलीस फौजदार सूर्यकांत जाधव यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा: पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या- स्वारगेट पोलीस वसाहतीतील घटना
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांकडून गंभीर गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल, तसेच वाहने पोलीस ठाण्याच्या आवरात लावण्यात येतात. चतु:शृंगी पोलिसांनी जप्त केलेली वाहने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारातील विद्यार्थी सुविधा केंद्राच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत लावली होती. पोलीस ठाण्याच्या आवारातून विद्यापीठाकडे जाण्यास मार्ग आहे. चोरट्यांनी जप्त केलेल्या दोन मोटारींचे आठ टायर, पाच वाहनांचे दिवे (हेडलॅम्प) असा एक लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांकडून याबाबत तक्रार देण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव तपास करत आहेत.