पुणे : मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण देण्याला आमचा विरोध आहे, असे माध्यमांशी संवाद साधताना मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी श्रीराम मांसाहारी होते, असे विधान केले. त्यावर “अति शहाणा त्याचा बैल रिकामा”, अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादीत जो हुरुप आहे, तो संपवण्याची इतर पक्षांना आता गरज नाही. त्यांच्याच पक्षातील लोक संपवतील, असे देखील भुजबळ यांनी म्हटले आहे.
हेही वाचा : ‘पीएमआरडीए’ची भूखंड लिलावासाठी घाई : विकास आराखडा मंजूर नसताना भूखंड लिलावाचा घाट
मंत्री भुजबळ यांनी जागावाटपावर भूमिका व्यक्त केली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडे चाळीसच्या आसपास आमदार आहेत, आमच्याकडेही ४० च्या आसपास आमदार आहेत. जितकी मंत्रिपदं त्यांना मिळतील तितकीच आम्हाला मिळतील. जितक्या खासदारांच्या जागा त्यांना, तितक्याच आम्हाला मिळतील. यात काही चुक आहे असं मला वाटत नाही. त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार”, असे परखड मत भुजबळांनी व्यक्त केले आहे. “कॅबिनेटमध्ये मी माझे विचार मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री व मंत्र्यांसमोर व्यक्त करतो”, असे देखील ते म्हणाले.