पुणे : महात्मा फुले यांच्या १३३ व्या स्मृतिदिनानिमित्त गंज पेठेतील समता भूमी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते. भुजबळ यांनी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. “फुले, शाहू, आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वाचलं पाहिजे. हे वाचलं की आपल्याला पुढे काय करायचं आहे हे कळेल. सध्या नवीन वर्ण व्यवस्था राज्यात येऊ पाहत आहे. ती वर्ण व्यवस्था वेगळी होती आणि आताची वर्ण व्यवस्था वेगळी. आता लायकी काढत आहेत. उषःकाल होता होता काल रात्र झाली, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, हक्कांसाठी आता लढावं लागेल”, असे भूजबळ म्हणाले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कर्मचारी अटकेत

“बाबासाहेब आबेडकरांनी हक्क दिले आहेत. कोणी गावात जाण्यास अडवले, तर त्याला एक महिन्याची सजा आहे. सगळे समाज एकत्रित राहिले पाहीजे. अश्रू रूपाने सगळे बाहेर येत आहे. दुःख असेल त्याला वाचा फोडू, मजबुतीने उभे राहू, हक्क जतन करण्यासाठी लढू, आता थांबायचं नाही. हक्कांवर गदा येत असेल तर लढायचं”, असं आवाहन छगन भुजबळ यांनी उपस्थितांना केलं. त्यानंतर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांना महात्मा फुले समता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार समीर भुजबळ, ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे, माजी सनदी अधिकारी महेश झगडे उपस्थित होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune chhagan bhujbal said that we have to fight if our rights are going to end svk 88 css