पुणे : पुण्यातील रस्त्यांवर सध्या तब्बल लाखभर रिक्षा धावत आहेत. रिक्षाचालकांकडून भाडे नाकारण्याचे प्रकार वारंवार घडताना दिसतात. प्रत्यक्षात मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओने) २०२३ मध्ये केवळ ८८ रिक्षांवर भाडे नाकारल्याप्रकरणी कारवाई केली आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात हात आखडता घेण्यात आल्याचे समोर आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मागील वर्षभरात आरटीओने २ हजार ४९५ रिक्षांची तपासणी केली. त्यात दोषी आढळलेल्या १ हजार ६१३ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. रिक्षांच्या तपासणीचा विचार करता केवळ अडीच टक्के रिक्षांची तपासणी आरटीओकडून झाल्याचे निदर्शनास आले आहे. या रिक्षांवरील कारवाईतून ३ लाख ४५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. एकूण कारवाईमध्ये भाडे नाकारल्याप्रकरणी वर्षभरात ८८ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती आरटीओतील सूत्रांनी दिली.

हेही वाचा…‘ससून’ प्रकरणात मोठी कारवाई होणार! चौकशी अहवाल रुग्णालयाकडून राज्य सरकारकडे

आरटीओने मागील वर्षी जादा भाडे आकारणाऱ्या ५८ रिक्षांवर कारवाई केली. जादा प्रवासी वाहतूक करणाऱ्या १४ रिक्षांवर तर मीटरचा वेग वाढविणाऱ्या ७२ रिक्षांवर कारवाई करण्यात आली. उद्धट वर्तन करणाऱ्या ५७ आणि इतर प्रकारची १ हजार ३२४ रिक्षांवर कारवाई करण्यात आली आहे. मागील वर्षी एकाही रिक्षाचा परवाना रद्द झालेला नाही. याचवेळी ६९ रिक्षाचालकांचा वाहन चालविण्याचा परवाना निलंबित करण्यात आला आहे, असे सूत्रांनी नमूद केले.

भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकांची तक्रार प्रवासी आरटीओकडे करू शकतात. ही तक्रार rto.12-mh@gov.in या ई-मेल करता येते अथवा प्रत्यक्ष आरटीओ कार्यालयात येऊन आणि पत्राद्वारे प्रवाशांना तक्रार करता येते. – संजीव भोर, प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी

हेही वाचा…संतापजनक..! पुण्यात १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोघांनी केला बलात्कार, आरोपींना अटक

रिक्षासाठी खुली परवाना पद्धत सुरू करण्यात आल्याने त्यांची संख्या भरमसाठ वाढली आहे. अनेक जण इतर व्यवसाय करून अर्धवेळ रिक्षा चालवितात. अशा रिक्षाचालकांकडून भाडे नाकारले जाण्याचे प्रमाण जास्त आहे. याचवेळी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांकडून नियमभंग करणाऱ्या रिक्षांवरील कारवाई ही केवळ दिखाव्यापुरती असते. – नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षा पंचायत

पुण्यात २०२३ मध्ये आरटीओची रिक्षांवर कारवाई

एकूण तपासणी – २४९५
दोषी रिक्षा – १,६१३
जादा भाडे आकारणी – ५८
जादा प्रवासी वाहतूक – १४
मीटरचा वेग वाढविणे – ७२
भाडे नाकारणे – ८८
उद्धट वर्तन – ५७
वाहन चालविण्याचा परवाना निलंबन – ६९
एकूण दंड – ३ लाख ४५ हजार रुपये

हेही वाचा…हळदीच्या निर्यातीत मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या देशांतून मागणी वाढली

प्रवाशांसाठी हेल्पलाईन

प्रवाशांनी रिक्षांबाबत तक्रार करण्यासाठी सध्या कोणतीही हेल्पलाईन अस्तित्वात नाही. प्रवाशांना रिक्षांची तक्रार करता यावी, यासाठी व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरू करण्याची चर्चा सुरू होती. मात्र, अद्याप त्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांकडून रिक्षांविरुद्ध तक्रार करण्याचे प्रमाणही कमी असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune city auto drivers refusing rides regularly citizens questioning against rto action pune print news stj 05 psg