पुणे : शहर भारतीय जनता पक्षाने पाच लाख प्राथमिक सदस्यांच्या नोंदणीचा टप्पा पूर्ण केला आहे. यामध्ये सर्वाधिक सदस्य नोंदणी भाजपचे नवे सत्ताकेंद्र झालेल्या कोथरूड विधानसभा मतदारसंघात असून येथे १ लाख १६ हजार ४ एवढी नोंदणी झाली आहे. सर्वधिक कमी नोंदणी हडपसर मतदारसंघात झाली आहे. दरम्यान, आगामी काही दिवसात सहा लाख प्राथमिक सदस्य आणि दहा हजार सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विधानसभा निवडणुकीत महायुतीला आणि पक्ष म्हणून भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यानंतरही या यशामध्ये फार रममाण न राहता भाजपने आता महापालिका निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांत भाजपने सदस्यनोंदणी मोहीम राबविण्याचे निश्चित केले होते. या पार्श्वभूमीवर भाजप पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा घेण्यात आली होती. शहरातील प्रत्येक बूथवर २०० सदस्य नोंदणी करण्याचे निश्चित करण्यात आले होेते. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील यशाच्या जोरावर हे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी या कामांना पसंती देऊन शहरातील भाजपच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी केले. त्याचेच प्रत्यंतर सभासद नोंदणीत येत आहे, असा दावा शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केला. समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा सदस्यता नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळत आहे. आगामी काही दिवसात सहा लाख प्राथमिक सदस्य आणि दहा हजार सक्रिय सदस्यांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचेही घाटे यांनी सांगितले. नागरिकांना मिस्ड कॉल, नमो ॲप, वेबसाईट, क्यूआर कोड या माध्यमांतून भाजपचे प्राथमिक सदस्य होता येणार प्रत्येक पाच वर्षांनी ही प्रक्रिया केली जाते. प्राथमिक सदस्यत्वाची मुदत सहा वर्षे इतकी असणार आहे.

विधानसभा मतदारसंघनिहाय सदस्यता संख्या

वडगाव शेरी : ५३, ५९९
शिवाजीनगर : ४९,७२५
कोथरूड : १,१६,००४
खडकवासला : ७२,७५४
पर्वती : ५४, ६१०
हडपसर : ३९,८२८
पुणे छावणी : ६४,४६९
कसबा : ५४,०१८