पुणे : शहर परिसरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी बाहेरून येणाऱ्या जड वाहनांना मंगळवारपासून (५ मार्च) पुणे शहरात येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुण्याबाहेरून मुंबई, सोलापूर, अहमदनगर, साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे यांनी केले.
शहरात मेट्रो मार्गिकेसह विविध विकास कामे सुरू आहेत. विविध कामांमुळे वाहतुकीचा वेग कमालीचा संथ झाला आहे. वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे पुणे शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मंगळवारपासून केली जाणार आहे.
हेही वाचा – संजय राऊतांना ‘ही’ सवय आहे का? चंद्रकांत पाटलांचा प्रश्न
हेही वाचा – पिंपरी : पाणीपट्टी थकबाकीदारांच्या तोंडचे पाणी पळणार; महापालिकेने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
पिंपरी-चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर या शहरातून पुण्यात येणाऱ्या जड वाहनांसाठी ही बंदी लागू राहील. वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुण्यातून बाहेर पडण्यासाठी शहरात जड वाहनांना प्रवेश करता येणार नाही. पुणे-नगर, पुणे-सोलापूर, पिंपरी चिंचवड शहर या मुख्य मार्गांवर जड वाहनांना पूर्णपणे बंदी असणार आहे. नगर रस्त्यावरील वाघोलीतून पुण्याकडे येणाऱ्या जड वाहनांना २४ तास प्रवेश बंद राहणार आहे. जड वाहनांनी शिक्रापूरहून चाकणमार्गे पिंपरी-चिंचवड आणि तळेगाव दाभाडेमार्गे मुंबईकडे जावे. नगरकडे जाणाऱ्या जड वाहनांनी थेऊर फाटा येथून लोणीकंद आणि शिक्रापूरमार्गे इच्छितस्थळी जावे.