पुणे : शिवाजीनगर भागात सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचे २ लाख ६० हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरून नेण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. याबाबत रितेश प्रधान (वय २३, रा. जगताप नगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रधान हे मेट्रो कंपनीत सिक्युरिटी सुपरवाइजर म्हणून काम करतात. सध्या पुणे मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गाचे काम सुरू असताना चोरट्यांनी कामगार पुतळा भागातून अडीच लाख रुपये किमतीचे बांधकाम साहित्य चोरून नेले. ऑगस्ट ते नोव्हेंबर २०२४ दरम्यान हा प्रकार घडला. त्यानुसार शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सहायक निरीक्षक राजकुमार केंद्रे पुढील तपास करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, यापूर्वी देखील मेट्रो मर्गिकेवरील साहित्य चोरी गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. शिवाजीनगर, चतुशृंगी तसेच खडकी भागात अशा घटना समोर आल्या आहेत. आतापर्यंत चोरट्यांनी मेट्रो मर्गिकेच्या कामाच्या ठिकाणावरून लाखोंचे साहित्य चोरून नेले आहेत. त्यामुळे वाढत्या चोरीच्या घटना आणि येथील कमकुवत सुरक्षा व्यवस्था देखील याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे.  

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In pune city metro construction materials worth 2 5 lakh rupees were stolen fir at shivajinagar police station pune print news vvk 10 asj